Sunday, November 14, 2010
दिवाळी सहल
काहीतरी नवीन बघायची इच्छा खूप दिवसापासून मनात होतीच ह्या वर्षी दिवाळीला घरात थांबायचे नाही हे मात्र नक्की होते कोकणात जावे ह्या मन्सुभ्यावर पाणी फिरल्यामुळे सुरवातीला जरा मूड ऑफ झाला खरा पण म्हणतात न कि फिरस्त्याला कोणी आडवू शकत नाही तसे काहीसे झाले आणि आम्ही कोल्हापूर,कणेरी,खिद्रापूर मिरज ह्या अतिशय जुनाट आणि लोकांना रस नसलेल्या ठिकाणाची निवड केली.सुरवातीला काही नवीन बघायला मिळेल ह्याची काही खात्री नव्हती त्यातच कुठलाही प्लान तयार नव्हता फक्त जायचे आणि धडकायचे हेच आम्ही ठरवले होते त्याप्रमाणे ४ ता. ला दुपारी निघालो आणि पहिला टप्पा कणेरी मठ हा पार केला. सिद्धगिरी महाराजाचा मठ आणि त्यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेला परिसर बघता क्षणीच कोणालाही आवडेल असा वाटला. रात्री मुक्काम आणि पेटपूजा ह्याची सोय झाल्यावर जरा हायसे वाटले.रात्री मस्त जेवण झाले आणि आम्ही पथाऱ्या पसरल्या. ह्या मठ मध्ये निशुल्क जेवण आणि मुक्काम ह्याची सोय होते फक्त रात्री बाहेर जाण्याची परवानगी ते देत नाहीत (?) पण एकुणात मुक्काम आणि परिसर फारच शांत आहे. सकाळी उठल्यावर ह्या मठात असलेले पूर्णाकृती पुतळ्यांचे प्रदर्शन डोळयांचे पारणे फेडून गेले. बारा बलुतेदार आणि अलुतेदार आणि पुरण काळापासून सर्व ऋषी मुनी ते रामायणा पर्यंत सर्व प्रसंग मूर्तीरुपात पाहणे हा एक सुंदर अनुभव होता. लंडन ला असलेले मादाम तुसा मेणाच्या पुतळ्यांचे प्रदर्शन पाहिलेल्यांनी हा अनुभवजरूर घ्यावा तरच कळेल कि भारतात ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये अशा पर्कारचा प्रयत्न फारच स्तुत्य आणि अभिनंदनीय वाटला. आजचा आमचा पुढचा मुक्काम हा जरा नवीन ठिकाणी होता आणि ह्या गावी कोणी गेले सुद्धा नव्हते. कोल्हापूर ला पोहचल्यावर महालक्ष्मी चे दर्शन आणि गर्दी टाळून आम्ही आमच्या मुक्कामाकडे कूच केले. जयसिंगपूर मार्गे छोट्या छोट्या वाड्या वस्त्या पार करीत आम्ही मार्गक्रमण करत होतो रात्री आठ वाजता आम्ही खिद्रापूर ह्या गावी पोहोचलो. लक्ष्मिपुजन आणि दिवाळीच्या शुभ संध्याकाळी सर्व गाव प्रकाशात न्हाऊन निघाला होता.दुसऱ्या दिवशी सकाळी ह्या गावात असलेले आणि कोणार्क येथील सूर्य मंदिराशी साम्य असलेले शंकराचे मंदिर आणि त्यावरील कोरीव काम पाहून एक वेगळी अनुभूती आम्ही सर्व जनानि अनुभवली. मंदिरावरील कोरीव नक्षी आणि सूर्यमंदिर पाहून तर अक्षरशा धन्य झालो. आजूबाजूला तसा कुठलाही दगड नसताना इसवी सनापूर्वी बांधलेल्या ह्या मंदिराने आम्हाला खचितच आनंद दिला. आणि पूर्ण प्रवास आणि सहल मार्गी लागल्याचे एक समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तीन दिवस आम्ही देह भान हरपून फिरत होतो त्याचे आज चीज झाले आसे वाटत होते. खिद्रापूर हे गाव कर्नाटक सीमेवर असल्या कारणाने इथे कन्नड आणि मराठी ह्या दोन्ही भाषा सर्रास बोलल्या जातात. कृष्ण काठी वसलेल्या ह्या गावाला २००५ साली पुराचा मोठा फटका बसलेल्या आठवणी हा गाव अजूनही मिरवताना दिसतो. जर २-३ दिवस हातात असतील आणि काही तरी नवीन बघायची इच्छा असेल तर ह्या दोन ठिकाणांना भेट दिल्यावर नक्कीच एक नवीन काहीतरी बघितल्याची अनुभूती मिळाल्याशिवाय राहणार नाही.
Subscribe to:
Posts (Atom)