Saturday, October 15, 2011

आली दिवाळी...


लहानपणा पासून सर्वाना दिवाळी ह्या सणाचे फार मोठे कौतुक असते. कधी हा सण येतो आणि मजा करायला मिळते असे ह्या सणाच्या निमित्ताने होऊन जाते. साधारण वीसेक वर्षापूर्वी पुण्यात वाडे संस्कृती असल्यामुळे ह्या सणाची मजा सर्वजण एकत्र येऊन घेत असत. परीक्षा संपल्या कि सर्व बच्चे कंपनी ला किल्ले करायचे वेध लागायचे.आम्ही सर्व लहान मुले माती कुठे मिळते ह्याचा शोध घेत फिरायचो आणि ती चाळून आणणे हा मोठा उद्योग असायचा.हे सर्व करण्या मध्ये वेळ कसा मजेत निघून जायचा.गल्ली मध्ये फिरताना घरा घरा मधून येणारे फराळाच्या पदार्थाचे सुगंध तर वेड लावत असत. कधी एकदा हा सण येतो असे होऊन जायचे. आम्हा मुला मध्ये तर कोणाचा किल्ला भारी ह्या गोष्टीवरून पैज लागायची आणि सर्व जण एकमेकांच्या घरी जाऊन किल्ले बघत असू. मित्रांच्या आया आम्हाला फराळाला आवर्जून बोलवत असत आणि आम्ही देखील मजेत त्यांच्या कडे जाऊन फराळावर आडवा हात मारत असू. दिवाळीच्या पहिल्यादिवशी तर धमाल असायची अभ्यंगस्नान करायच्या आधी गल्लीत जाऊन एखादा चुकार मुलगा मोठा आटोम बॉम्ब लावायचा आणि सर्व गल्ली कशी जागी होईल हेच पहायचा. ओट्यावर झोपलेल्या लोकाजवळ तर हटकून हे असले प्रकार व्हायचे आणि सकाळी सकाळी बोंबाबोंब सुरु व्हायची मग आम्हाला सकाळी उजाडल्यावर विषय मिळत असे. फटके फोडण्यावरून तर किती वाद व्हायचे ह्याला काय सुमार नसायचा. जागा मिळेल तिकडे फटाके फोडले जायचे आणि लोक बोंब मारत घराबाहेर यायचे.नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन,पाडवा हे सर्व सण दणक्यात साजरे व्हायचे. आकाश कंदील घरी बनवणे ह्या सारखा आनंद नाही आणि आम्ही तो मनसोक्त उपभोगला आहे.
काल परवा मी मार्केट मध्ये खरेदी करायला गेलो होतो म्हटले दिवाळीची खरेदी करावी तर सर्व संदर्भ बदलल्या सारखे वाटले खूप सपकपणा जाणवला लोकांचा उत्साह होता पण त्यात कुठेतरी सर्व जण आपल्या परीने लहान पणी दिवाळी कशी साजरी करायचो आणि आता किती तरी बदल त्यात आला आहे हाच विचार करत खरेदी करत आहे असे वाटत होता. लहान मुलांचे किल्ले हे आता रेडीमेड मिळतात हे बघून तर हसावे कि रडावे हेच कळेना. आणि मंडळी ते पण मजेत खरेदी करत होती असो.
दिवाळी सणात दिव्यांची आणि पणत्यांची जी काही खुमारी असते ती लाजवाब म्हणयला हवी.