अखेर तो आला... जून महिना संपता संपता त्याने हजेरी लावली. गेले कित्येक दिवस आपण सगळे या दडपणाखाली जगतो आहोत. पाणीकपातीची टांगती तलवार कायम मानगुटीवर असल्याने सगळ्याचे डोळे आकाशाकडे लागले होते. मागच्या वर्षी हुलकावणी देऊन धरणात किरकोळ पाणी साठा ठेवून तो गेला होता. आपल्या सर्वांना मूत्र पिण्यास लावता लावता तो थोडा बरसला होता हीच काय ती जमेची बाजू होती. ह्या ही वर्षी हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजावर आपला हवाला आहे. माऊलींच्या पालखी प्रवेशाने सर्व जण आनंदात असताना ही रिपरिप हवीहवीशी आहे.
पाऊस.... खरंच किती आतुरतेने वाट पाहत असतो आपण त्याची.....
धरतीवरील सर्व जीवांना हवाहवासा वाटणारा पाऊस...
कीती ही चिखल, गैरसोय झाली तरी हवाच असतो तो पाऊस...
मनातल्या मरगळलेल्या भावनांना चालना देणारा पाऊस...
प्रेमात पडलेल्या जीवांना जवळ आणणारा पाऊस...
कवितेत भेटून चिंब भिजवणारा पाऊस..
नखशिखांत चिंब भिजल्यावर सौंदर्य खुलवणारा पाऊस...
मातीत रूजलेल्या तृणांना जीवन संजीवनी देणारा पाऊस...
कड्यावरील अनवट वांटावर खळाळत वाहणाऱ्या पाण्याचा पाऊस...
गद॔ धुक्यात लपेटलेल्या शालीतून कोसळणारा पाऊस...
ग्रीष्मात तप्त झालेल्या धरणीची तहान भागवणारा पाऊस...
भेगाळलेल्या जमीनीत मुरणारा पाऊस...
तृणांचे गालीचे सजवणारा पाऊस...
झाडावर पानाशी घसट करणारा पाऊस..
पानाच्या टोकावरून थेंब थेंब पडणारा पाऊस...
घराच्या पत्र्यावर ताशा वाजवणारा पाऊस...
पत्र्याच्या भोकातून ठीबकणारा पाऊस...
ऊरात स्पंदन निर्माण करणारा तसेच धडकी भरवणारा पाऊस...
शेतकऱ्याच्या गालावरच्या आसवात मिसळणारा पाऊस...
अवखळ बालकांच्या मिश्कील लीलांमधून डोकावणारा पाऊस...
डोंगरातून धबाबा आदळत खाली येणारा पाऊस...
मल्हार रागाच्या समेवर कोसळणारा पाऊस...
कीती रूपे आठवावी... वरील रूपात भेटलेला, आपल्या सगळ्यांच्या मनात दडलेला हा पाऊस बरसायला लागलाय चला तर मग आपण सगळे मिळून त्याचे स्वागत करूयात आणि मनात रूंजी घालणाऱ्या आठवणी जमा करू....