पी.व्ही.सिंधु च्या रौप्यपदकाच्या निमित्ताने द्वारकानाथ संझगिरीने पुलेला गोपीचंद वर लिहिलेल्या लेखातील काही भाग....
'सुंदर ते हात, ज्याला निर्मितीचे डोहाळे.’
सिंधूला घडवणारे हातही फार महत्त्वाचे आहेत. ते पुलेला गोपीचंदचे आहेत. या देशात चंद्रगुप्तएवढाच चाणक्य मोठा ठरतो. कारण गुरू-शिष्य परंपरेचं महत्त्व या आपल्या संस्कृतीत मुरलंय! हे पदक सिंधूइतकंच गोपीचंदचं आहे असं म्हणावं इतके परिश्रम त्याने घेतले आहेत. आपल्या देशाने काही महान खेळाडू निर्माण केले. त्यात एक गोपीचंद! त्याने 2001 साली ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप म्हणजे बॅडमिंटनचं विम्बल्डन! त्यापूर्वी एकाच भारतीयाने ती जिंकली होती तो म्हणजे प्रकाश पदुकोण. एकेकाळी जगात तो चौथ्या क्रमांकाचा खेळाडू होता. शीतपेयाची जाहिरात त्याच्याकडे एका मोठ्या चेकसकट चालत आली. त्यानं चक्क नाही म्हटलं. कोकची सवय लहान मुलांना हानिकारक म्हणून? तो क्रिकेटपटू नव्हता, लागोपाठ जाहिरातींच्या कॉण्ट्रक्टस मागे धावायला! ही काळ्या कपड्यातील लक्ष्मी नव्हती. ही शुभ्र कपड्यातली लक्ष्मी होती. त्यावर एक छोटासा डाग आहे असं त्याला वाटलं. त्याने तिला झिडकारलं! तो अचानक मनात वेगळ्याच जागी जाऊन बसला. फारशी लाडकी मंडळी तिथे जाऊन बसलेली नव्हती. मीसुद्धा त्यावेळी गोपीचंदच्या बुटात पाय घालून उभा असतो तर तसा वागलो असतो असं वाटत नाही. मी हुशारीने तो डागच नाही असं मनाला समजवलं असतं. माणूस मुखवटा चढवू शकतो. स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. पुढे दुखापतीमुळे त्याला लवकर निवृत्त व्हावं लागलं. त्याच्या या काळात त्याला लक्षात आलं की, भारतात अशा दुखापतींवर मात करून पुन्हा घट्टपणे उभं राहायच्या सुविधा नाहीत. त्याने देशाला, नशिबाला कुणाला दोष दिला नाही. त्याच्या डोक्यात क्रांतिकारी विचार आला. आपण त्या सुविधा निर्माण केल्या तर? भविष्यात एखाद्या गोपीचंदला कारकीर्दीवर पाणी सोडावं लागणार नाही. नवे दर्जेदार खेळाडूही तयार करता येतील. बा.भ. बोरकरांनी म्हटलंय, ‘‘सुंदर ते हात, ज्याला निर्मितीचे डोहाळे.’’
गोपीचंदच्या हाताला निर्मितीचे डोहाळे लागले म्हणून आपण सिंधू काय, श्रीकांत काय पाहतोय.
यापूर्वी अनेक खेळाडूंनी या देशात वल्गना केल्या आहेत- ‘‘जे खेळातून कमावलंय ते खेळाला परत द्यायचं!’’ काहींनी फक्त वल्गना केल्या. काहींनी प्रयत्न केले. काही आजही वल्गना करतायत. पण गोपीचंद प्रत्यक्षात ते करतोय. त्याचा दर्जा, त्याचा त्याग वेगळाच आहे. व्यावसायिकतेच्या वेगळ्याच स्तरावर तो उभा आहे. त्या स्तरावरचा दुसरा भारतीय खेळाडू मला कष्टाने शोधावा लागेल. त्याला आंध्र सरकारने हैदराबादच्या आयटी कॉरिडॉरमध्ये पाच एकर जागा स्वस्त दरात दिली. त्याच्या प्रोजेक्टचा खर्च होती तेरा कोटी! त्याने काही क्रीडाप्रेमी लक्ष्मीपुत्रांकडे मदत मागितली, पण त्याला फार यश आलं नाही. बॅडमिंटन म्हणजे ग्लॅमर असलेलं क्रिकेट नव्हे किंवा त्याला आयपीएलप्रमाणे ग्लॅमरस बाजार उभारायचा नव्हता. कोण कशाला पैसे देईल? गोपीचंदने आपलं घर गहाण ठेवलं आणि साडेतीन कोटी उभे केले. थोडक्यात, घरावरून नांगर फिरला जाण्याची मानसिक तयारी केली. मग निम्मा गुड्डा प्रसाद नावाचा बिझनेसमन त्याच्यामागे पाच कोटी घेऊन राहिला. त्याची अट एकच! ‘‘एक तरी ऑलिम्पिक मेडल जिंकून दे.’’ गोपीचंदने त्याला आता दोन मिळवून दिली. 2012ला सायना नेहवाल आणि आता सिंधू!
गोपीचंदची कहाणी इथे संपत नाही. इथून सुरू होते. सुविधा उभ्या राहिल्यावर जास्त कष्ट सुरू होतात. तो रोज सकाळी चार वाजता ऍकॅडमीत येतो. हे तो बारा वर्षे करतोय. सकाळचे पहिले तीन तास सिंधू-श्रीकांतसाठी असतात. सिंधूचा स्टॅमिना का चांगला? ती स्मॅश का चांगली मारते? ती शटलकॉकपर्यंत कशी पटकन पोहचते? तिचे गुडघे, खांदे वगैरे तिला इतकी सुंदर साथ का देतात? कारण मशिनगनमधून शटलकॉक कोर्टाच्या वेगवेगळय़ा ठिकाणी, विविध उंचीवरून आणि कोनातून टाकली जातात आणि सिंधू तिथे पोहचतेय हे तो पाहतो. एक तासाचा स्टॅमिना असावा आणि लाँग रॅलीज खेळून घणाघाती स्मॅश मारले पाहिजेत. त्यासाठी हा अट्टहास आहे. परवा उपांत्य फेरीत त्या जपानी मुलीवर सिंधूचे स्मॅश आगीच्या लोळासारखे कोसळले ना, त्यामागे ही मेहनत आहे. खरं तर त्या मेहनतीचा एकदशांश भाग असावा.
गेले काही महिने गोपीचंद स्वतः कार्बोहायडेट्स खात नाही. कारण यांच्याबरोबर सराव करायला त्याला फिट रहायचंय. सिंधूला तर चॉकलेट्स आणि हैदराबादी बिर्याणीपासून मैलभर लांब ठेवलंय. खेळाडूंचा नरसिंग यादव होऊ नये. कुणी घातपात करू नये म्हणून सिंधू-श्रीकांत यांना घराबाहेर पाणी प्यायला मनाई होती. देवाचा प्रसाद आणि तीर्थसुद्धा गोपीचंदने तिला घ्यायला दिलं नाही. त्याला माहीत आहे, अशा वेळी देव रागवत नाही. उलट प्रसन्न होतो. रिओत ती फक्त गोपीचंदबरोबर जेवू शकते आणि रिओत गोपीचंद पहाटे दोन वाजता उठतो. कारण त्याला आधीच्या मॅचचं तासभर ऍनॅलिसिस करायचं असतं. उगाच पदक विजेता तयार होत नाही! संगमरवरात कितीही मूलभूत सौंदर्य असलं तरी प्रत्येक दगडातून ताजमहाल उभा राहत नाही. ते घडवणारे हात बऱयाचदा अदृश्य असतात, पण ते महाल उभा करतात.
ते हात दिसावेत एवढाच हा प्रपंच.
लेखक - द्वारकानाथ संझगिरी.
यांच्या कडून साभार
अतिशय सुंदर असा हा लेख... एखाद्या खेळाडूमागे किती कष्ट त्याच्या प्रशिक्षकाने घेतले ह्याचा वस्तुपाठच घालून देतो. मुद्दाम संग्रही रहावा म्हणून मी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करतोय.