आताशा मी तसा रोजच सकाळी फिरायला जायचा चंगच बांधलाय गेले महिना भर तरी मी रोज सकाळी उठून नित्यनेमाने बाहेर फिरावयास जातोच जातो. कानात रेडिओ त्यात विविध भारती ची जुनी गाणी हा आता रोजचा शिरस्ता झालाय. त्यात एक अजून दागिना आपल्या सर्व लोकांच्या नाकाला लागलाय आणि तो म्हणजे मास्क,ज्या पासून पुढील सहा महिने तरी सुटका नाहीये असे ऎकीवात येतेय असो. घराबाहेर पडल्यावर मी तसा नाका समोर चालायला सुरवात करतो. सातारा रोड सकाळी पार करणे हे देखील दिव्य आहे. वाहनाचा राबता आता बराच वाढलाय पूर्वी पुण्यात असला काही नव्हतं एखाद गाडी आलीतर यायची नाहीतर सगळीकडे सामसूम असायची. चालायला सुरवात झाल्यावर गाणी ऐकता ऐकता मी काही निरीक्षण करत असतोच. जसे कि आपल्याला तेच तेच लोक तेच तेच कपडे घालून भल्या सकाळी दिसतात.काही लोक भाजी घेऊन विकायला बसलेली असतात काही लोक तीच भाजी घेऊन ऑफिसला डबा घेऊन जायच्या तयारीने येतात. रस्त्याच्या कडेला एखादा भिकारी कुडकुडत झोपलेला आढळतोच.काही लोकांचा चालण्याचा वेग हा जास्त असतो काही लोकांचा रमत गमत चालण्याचा मूड असतो. सूर्यनारायण जेव्हा दर्शन देतात तेव्हा काही मंडळी हटकून फुटपाथ वर थांबून त्याचे दर्शन घेतात. नाही म्हणायला काही लोक शेकोटी करून कोंडाळे करून गप्पाचा डाव मांडून बसलेली असतात. सकाळी अजून एक हटकून दिसणारे दृश्य म्हणजे रस्त्यावरील भटकी कुत्री... रात्र सरलेली असते ह्यांना भूक हि लागलेली असते मग काही लोक त्यांना खायला खाऊ आणून देतात तर काही लोक त्यांना प्रेमाने जवळ घेताना हि दिसतात. रस्त्यावर गर्दी कमी असते म्हणून असेन किंवा सकाळी घाईची वेळ असेन म्हणून असेन दोन चाकी वाहनाचा वेग हा विलक्षण असतो आणि धडकी भरवणारे आवाज करत हि सुसाट वेगात जात असतात. मनपाचे कर्मचारी देखील सकाळी साफ सफाई च्या कामात गुंतलेले असतात. त्यांना त्रास द्यायला डुकराच्या झुंडी कचरा चिवडून रस्त्यावर आणायची कामे इमाने इतबारे करताना मला रोज आढळतात.सध्या सकाळी थंडी गुलाबी असल्या कारणाने आसमंत सगळं धुक्याची दुलई पांघरून असतो. रोजच्या प्रमाणे मी आजही मी बाहेर पडलो होतो साधारण ४ किमी चा माझा रोजचा वॉक असतोच. आज सकाळी जरा नवल घडले. मी सहसा अनोळखी लोकांना कधी ओळख दाखवत नाही पण सोसायटी मध्ये आत येताना महानगर पालिकेचा एक कर्मचारी रास्ता झाडात असताना मला अनाहूतपणे गुड मॉर्निंग म्हणाला मी देखील त्याला सहज विश करत पुढे आलो पण अशिक्षित आणि रास्ता झाडणाऱ्या एक सफाई कर्मचाऱ्याने मला सकाळी सकाळी दिलेला हा सुखद धक्का होता... माझी सकाळ तर तशी तरोताजा सुरु झाली पण त्यालाही मला विश करावेसे वाटले हे पाहून मनोमन सुखावलो आणि घराकडे झपझप चालू लागलो.