Wednesday, March 26, 2014

दोन पाखरांचा संसार...

गेले दिडेक वर्ष तरी माझ्या घराच्या बाहेर चिमण्या करिता मी एक घरटे लावून ठेवले होते. त्यांना खाद्य देणे, पाणी ठेवणे हि कामे पण इमाने इतबारे चालूच होती. पण चिमण्या काही केल्या त्या घरट्या मध्ये जात नव्हत्या आणि माझी घोर निराशा होत होती. खरतर, एखाद्या माणसाला कुठले हि घर दिले तर तो लवकर बाहेर पडायचे नाव घेत नाही. जुने भाडेकरू आणि मालक ह्यांच्या मधला वाद तर मी लहान पणापासून बघत आलो आहे. आपल्या चाळीतील भाडेकरूला बाहेर कसा काढायचा आणि आपल्या जागेवर कब्जा कसा मिळवायचा अशा विवंचनेत घर मालक असा हा आज कालचा काळ आणि इथे मी चिमण्या करिता फुकट घराची सोय केली आहे आणि त्या त्यात जात का नाहीत ह्याचे कोडे काही केल्या मला उलघडत नव्हते.असे मी काय चुकीचे घरटे त्यांना बांधून ठेवले आहे कि त्यांनी त्याकडे पाठ फिरवावी. माझ्या मनातला खल काही केल्या मला स्वस्थ बसू देत नव्हता. चिमण्या गायब झाल्या आहेत ह्याची ओरड तर आपण सर्व जण ऐकत आहोतच, पण मग इथे ह्या दिसतात आणि घरट्या कडे का जात नाहीत ?  ह्या गोष्टीमुळे खूप नवल वाटत होते.

त्यांचे घरटे ज्या लाकडी बॉक्स पासून तयार केले आहे ती तर कल्पना अफलातून होती, तरी पण ह्या त्यात का जात नाहीयेत? अखेर काल अर्णव ने ह्याला वाचा फोडली. मी जो लम्बुलका बॉक्स तयार केला होता तो जरा अमळ खोल होता. चिमणी आत जाऊन बाहेर कशी येणार ह्याची कुठलीच सोय त्यात नव्हती. शेवटी मला इतके वर्ष पडलेले कोडे ह्या चिमुरड्याने क्षणार्धात सोडवले होते. तो बॉक्स आडवा केल्यावर चिमण्यांनी त्यांचा संसार मांडायला लगेच सुरवात केली. म्हणजे इतके दिवस मोकळा पडलेला एक सुंदर फ्ल्याट त्यांना आवडला होता. आता पावसाळ्याच्या अगोदर त्या मध्ये एखादा चिमुकला पाहुणा देखील येईल. अर्थातच आमच्या तिघांच्या हि चेहऱ्यावर हसू फुलले. एका मोकळ्या पडलेल्या घरट्याला आता उब मिळाली आहे. 

Saturday, March 22, 2014

पुंजका विचारांचा

वेळ सकाळची. ऑफिसला जायची सर्वाना घाई, साधारण ९ वाजता. स्थळ- सिंहगड रोड... ट्राफिक अडकत अडकत पुढे सरकतंय, उन्ह तापायला लागली आहेत आणि सूर्य आपले काम चोख बजावतोय. मनातले विचार....

च्यायला वैताग आलाय ह्या ट्राफिक चा ssss
हा सिग्नल किती वेळ घेतोय पुढच्या वर्षी ग्रीन होणार कि काय sss 
आयला activa वाली  मस्त ड्रेस घातलाय..
ओ भाऊ, जरा गाडी बाजूला ठेवा नवीन गाडी आहे माझी, घासेल ना sss 
कोणास ठावूक पुण्यात एवढी माणसे कुठून आली आहेत तडमडायला..
नुसत्या टू व्हीलर आहेत राव..
ह्या रोड वर फ्लाय ओवर कधी होणार कोणास माहित...
हे राजकारणी * * घाले आहेत..
सिंहगड रोड ची वाट लावली पार..
धूळ,धूर,घाण,प्रदूषण  वाटते परदेशी राहावे. (मनात हसू) 
कसली sss बिलगून बसलीये राव...( मनात कालवा कालव)
अजून किती दिवस हे अस चालणार काय माहित..
गाडी मस्त ठेवलीये साल्याने.. एकदम चकाचक..
हा पोलिस माझ्या कडे तर येणार नाही ना..
साला, कधी BMW येणार अशी आमच्या आयुष्यात..
काय, खड्डे आहेत यार रोड वर...
नदीकाठचा रस्ता मोकळा असेल तर गाडी जाम बुन्गवता येते ..
कसलं खतरनाक मॉडेल आहे गाडीचे...


हे आणि इतर बरेच विचार मनात येत असतात आपण आणि आपली बाईक हे चालत राहतात. ह्या सर्व विचारात ऑफिस कधी येते हेच कळत नाही. दिवसभर तिथेच थांबायचे असते काही काम नसले तरी...आणि असले तरी..









Saturday, March 15, 2014

माझे खाद्यायन

परवा एका हॉटेल मध्ये जायचा योग आला, खूप दिवसाने मसाला डोसा खायची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली. आमच्या बाजूच्या टेबलवर एक मध्यम वयीन फिरंग बाई येउन बसली होती मी खात खात तिचे निरीक्षण करत होतो.खरतर इतकी वर्ष ह्या फिरंग लोकांना बघत आलो आहे ह्या लोकांची ढबच न्यारी असते काही म्हणा ! सांगायचा मुद्दा हा कि, ती पण सावकाश तिच्या डोस्याचा आस्वाद घेत होती. इकडे मी बचक बचक खात होतो भुकेने मला काही सुचत नव्हते आणि हि बया एकदम सावकाश एक एक घास खाऊन चावून चावून रवंथ करीत खात होती. लहान पणा पासून आपण सर्व जण इंग्रजी सिनेमे पाहत आलो आहे पण मला जेव्हा जेव्हा पदद्यावर खायचा सीन दिसायचा आणि हि लोक खाताना दिसायची तेव्हा एकच प्रश्न पडायचा कि हे लोक कमी बोलत कसे खाऊ शकतात आणि आपल्याला का जमत नाही. सिनेमा संपून बाहेर येताना मी संकल्प केलेला असायचा कि मी पण ह्याच पद्धतीने खाणार आणि पुढच्या काही दिवसात माझा हा संकल्प मोडकळीस आलेला असायचा.

सांगायचा मुद्दा हा कि, हि मस्त त्या पदार्थाचा आस्वाद घेत खात होती सोबतीला तिने लायिंम जूस हि मागवला होता मग काय पाहता, तिचे सर्व तब्येतीत चालले होते आणि इकडे मी बायकोच्या शिव्या खात होतो कारण माझे सांभार चमच्या मधून टेबलवर पडून माझ्या तोंडात पोहचत होते.
फिरंग लोका कडून काही नाही तरी त्या दिवशी मी सबुरीने खायचे कसे ह्याचे प्रात्यक्षिक जणू काही शिकून गेलो. आणि नेहमीप्रमणे हॉटेल मधून संकल्प करून बाहेर पडलो कि मी पण चवी चवी ने पदार्थ खाणार.

Monday, March 10, 2014

अज्ञान (?)

काही दिवसा पूर्वी आमच्या सोसायटी मध्ये पाण्याच्या पंपाचे काम चालू होते आणि मी नकळत माझ्या लहानपणीच्या आठवणी मध्ये रमलो. आमचे काकांचे शेत वडकी नाल्याला होते आणि आम्ही शाळेत असताना रविवारी किवा सुट्टी च्या दिवशी त्यांच्या बरोबर कल्ला करायला जात असू. शेतावर आणि बांधावर फिरताना खरच खूप मज यायची. तसे आमचे काम काही नसायचे पण जीप मधून जायला मिळतेय आणि ते हि शेतावर मग काय आम्ही एका पायावर तयार असायचो. १३ एकरात पसरलेलं विस्तीर्ण शेत. गाडी लावायचो तिथे जाई बाईचे  घर आणि विहीर होती तिचे पाणी हि तेवढेच गोड होते. तिथे गेल्यावर थकवा असा जाणवायचा नाहीच. मनसोक्त हुंदडणे हा आमचा क्रम असायचा. किसन बैल घेऊन आला कि त्यांच्या मागे काठी घेऊन जायचे. कुळवणी कशी करतात ह्याचे बिनतोड प्रात्यक्षिक आम्हाला दिसायचे,गोफण फिरवून पाखर उडवणे म्हणजे काय असते हे केल्याशिवाय कळणार नाही. हुरडा पार्टी, मटन पार्टी  हाय ज्या काय झ्याक काट्यागिरी मध्ये मोडणाऱ्या पार्ट्या आहेत त्या आम्ही लहानपणीच झोडल्या. एकेदिवशी काकांबरोबर एका नवीन विहिरीचे काम बघायला जायची संधी मिळाली. शनवार पेठेतून कासम भाई कडून सुरुंगाची दारू आणून ति विहिरीत काम करत असलेल्या कामगारा पर्यंत आम्ही पोचवायचो. पहारीने केलेल्या खोल खड्यात ति दारू भरून वात पेटवली कि लांब लांब पळायचे आणि एकच आवाज होऊन सर्व दगडाच्या ठिकर्या हवेत भिरकावल्या जायच्या स्वताला वाचवत आम्ही जीव घेऊन पळायचो पण परत येउन बघितले कि मोठा खड्डा झालेला दिसायचा आणि मग परत पुढील काम सुरु व्हायचे.त्याकाळी किती माणसे उपलब्ध असायची आणि ३-४ महिन्या मध्ये विहीर बांधून तयार पण व्हायची आज सारखे यंत्रवत तेव्हा काहीच नव्हते.

हे सर्व विचार इतक्या झर्रकन माझ्या मनात येउन गेले आणि मी गुरुजींनी टाकीवर फोडायला घेतलेला नारळ बघून भानावर आलो आणि एक अतिशय बालिश आणि जुनाट प्रश्न मी प्लंबर ला विचारला " अहो, पण इथे टाकीला पाणी चढवायला मोटर कुठाय? त्याने चमकून माझ्याकडे बघितले आणि "काय येडय" म्हणून मला सांगितले कि " साहेब आजकाल मोटारी पण पाण्यात बुडवून ठेवणाऱ्या मिळतात त्यांना बाहेर ठेवायची  गरज लागत नाही" मी चाटच झालो आणि खरोखरच माझ्या अज्ञानाची मला कीव आली आणि तंत्रज्ञान किती पुढारलेले आहे ह्याची प्रचीती... मनोमन मी हात जोडले आणि फक्त पुटपुटलो कालाय तस्मे नमः....

Saturday, March 8, 2014

वेडा राघू...

आज खूप दिवसांनी लिहावेसे वाटले आणि कारणे शोधू लागलो. डोक्यात विचाराचा भुंगा चालूच. काय लिहावे आणि कसे लिहावे ह्याच गोष्टीने मन कातावले होते.आणि मला कारण सापडले... गेल्या दोन तीन दिवसापासून मी जर वेड गळा सारखा वागतोय आसे माझे मलाच जाणवले. बायको ने पण मला विचारले कि कुठे आहेस म्हणून पण माझ्याकडे उत्तरच नव्हते. साध्या साध्या गोष्टीत चुका होत आहेत आणि मी त्या सुधारू शकत नाही. माझे मलाच हसायला येत होते. खूप काही गंभीर नाही पण माझे वागणे मलाच नवीन आहे आणि त्यावर मलाच तोडगा शोधयला  हवाय.आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टी पण खूप काही शिकवून जातायत पण बहुदा माझेच शिकायचे मन नाहीये.इतक्या वर्षात मी असा नवीन अनुभव पहिल्यांदा घेतोय. खरतर मनाचा ठोका एकवेळ चुकतो कि हे असच तर चालू नाही न राहणार कि मीच कुठल्या तरी तंद्री मध्ये आहे आणि जग मला बघून हसतंय असा काहीसं मनात दाटून येतंय. बहुदा मनाची अशी घालमेल सर्वांनी कधी न कधी अनुभवली असेल किवा ज्यांची वय झालेली आहेत त्यांनी कदाचित हा अनुभव घेतला हि असेल.खूप काही विचार केला तर हाताला काहीच सापडत नाही आणि मग नुसता हात चोळत बसने हाच एक पर्याय उरतो.बहुदा मीच माझ्या ह्या मनाच्या खेळांकरिता कारणीभूत आहे. उगाच नको ते विचार मनात आणून आजचा माझा दिवस आणि वेळ मीच तर नाही ना वाया घालवत...हे हि कारण असू शकते.

पण खर सांगू का.. माझ्या ह्या मनाच्या खेळांची पण मी मजा घेतोय कारण माझ्यातलाच "मी" शोधायचा प्रयत्न करतोय.मनाचे हे खेळ खरतर सर्वांनी अनुभवले असतील हि कदाचित, दरवेळी आपल्या हाताला काय लागले ह्या पेक्षा जे हाताला लागेल ते लागेल पण ह्या मनाच्या खेळाची मजा तर अनुभवू यात
...