साल असावे 2011.. सिंबायोसिस च्या एका संस्थेत सेवा बजावत असताना आलेला हा योग कधी न विसरण्या सारखा. त्या वेळी कौन बनेगा करोडपती चा दुसरा सीजन चालू झाला होता. प्रेक्षक संख्या जास्त दिसावी ह्या करीता मिडिया च्या विद्यार्थ्याना पाचारण केले जाते...का तर, पुढील काळात त्यांना असे कार्यक्रम तांत्रिक अनुषंगाने कळावेत. पुण्याहून सकाळी लवकर निघून गोरेगाव येथे पोहोचण्यास वेळ लागलाच. दादासाहेब फाळके चित्रनगरीत सोळा नंबर स्टुडिओत आमची जेवणाची व्यवस्था सोनी वाहीनी तर्फे केलेली होती. आमच्या आधीच काही मंडळी येऊन थांबली होती प्रत्येकाला आत सेटवर कधी जातो असे झाले होते. बच्चन सरांना बघता येणार ते ही याचि देही याचि डोळा... दुग्धशर्करा योग आला होता. दोनेक च्या सुमारास आत जायचा पुकारा झाला आणि गारेगार वातावरणात प्रवेश करते झालो. नजर भिरभिरत सरांना शोधत होती पण तेच दिसत नव्हते. वाहीनी ची लोक स्पर्धकांना टिप्स देण्यात मग्न होते. अधूनमधून सेट स्वच्छ दिसण्या करिता पोछा मारायचे काम केले जात होते. आम्हाला पण कसे हसायचे आणि कशाप्रकारे टाळ्या पिटायच्या ह्याची तयारी करवून घेतली गेली. सूत्रबद्ध आणि शिस्तीत काम चालू होते. हे सगळं होऊस्तोवर पाच कधी वाजले कळलेच नाही तेवढ्यात दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचे आगमन झाले. आणि सुरू झाला एक रोमांचक शो जो इतके दिवस टिव्हीवर पहात आलो होतो....तो आज समोर घडताना बघत होतो एका अचाट शक्तीचा अनुभव घेत होतो. व्यावसायिक कलाकार म्हणजे काय हे तिथेच कळले. सेटवरचा माहोल इतका बदलला की सर्व जण तल्लीन होऊन गेले. त्यांनी आलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधत ही कामगिरी लिलया पार पाडली. नेटके आयोजन तितकाच ताकदीचा कलाकार हा योग मस्त जुळून आला होता. मध्येच एक पावसाची जोरदार सर आल्याने चक्क शुट थांबले कारण वरच्या पत्र्यावर वाजणारा आवाज काहीसा भयावह होता. पण नंतर सर्व काही सुरळीत पार पडले. कार्यक्रम संपल्यावर बच्चन सर स्वतः येऊन प्रेक्षका बरोबर फोटो काढून घेत होते. सुंदर असा हा पाच तासांचा प्रवास संपल्यावर मनाला हुरहूर लागुन राहीली आता परत कधी हा योग पुन्हा येणार नाही ह्याची. ते पाच तास खरतरं आयुष्यातील सुखद अनुभव म्हणून मी जपून ठेवले ते कायमचेच...
Saturday, October 8, 2016
Friday, September 16, 2016
कोणास करू तक्रार बाप्पा !!!
विसर्जना नंतरचा दुसरा दिवस सकाळी नेहमीच्या वेळी मी शोरूम उघडले आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. परवा सगळं ठाकठीक ठेवलेल्या वस्तूंची जागा बदललेली होती . एक काचेची फ्रेम खाली पडून फुटलेली.. ट्राॅफी वरून पडून चक्काचूर.. मी शेजारी चौकशी केली तर धक्कादायक बाब म्हणजे डीजे च्या दणदणाटाने झालेला हा प्रताप हे ऐकून माझ्या मस्तकात रागाची ठिणगी पडली.... मी शिव्यांची लाखोली वाहात असताना माझ्या कानात.... प्रथम तुला वंदीतो कृपाळा ... गजानना गणराया चे स्वर ऐकू येउ लागले... पूर्वी साजरा होत असलेल्या या उत्सवाचे बीभत्स उत्सवात होत असलेले परिवर्तीत रूप क्लेशदायकच म्हणायला हवे..
बाप्पाची मिरवणूक काढून धमाकेदार विसर्जन करण्यात आले. दहा दिवसांचा उत्सव संपला. पुण्यातील व पुण्याच्या आजूबाजूला असलेल्या गावातील लोकांना एक पर्वणीच होती. सर्वांनी धमाल केली. दरवर्षी प्रमाणे ह्या ही वर्षी चैन पडत नसताना बाप्पाचा निरोप घ्यावा लागला. बर्याच फुकट्यांना लाईट्स आणि डीजे च्या रटाळ , तद्दन गाण्यावर नाचून भरून पावल्याची अनुभुती मिळाली असेल. आपण एका बुध्दीच्या देवासमोर मुन्नी ला बदनाम करत, डीजे च्या आईला शिव्या घालत, झिंगाट नाचून, सैराट झाल्याची भावना सुखावून गेली असेल. टिळकांनी सुरू केलेल्या ह्या बुध्दीच्या देवाच्या लोकोउत्सवाचे आता नकोउत्सवात रूपांतर होतेय असेच वाटते. कोणाचे मंडळ कीती भारी , आरास, डीजे ह्यावर होणारा हा खर्च टाळून समाजोपयोगी कार्य करणारी किती मंडळे असतील हे देवबाप्पाच जाणो. इतकी तरूणाई ह्या धूडगुस तालावर थिरकत असताना समाजातल्या असंख्य प्रश्नाची ह्याना कल्पना असते का असा प्रश्न पडल्यावाचून रहात नाही. पण जे काही चालू आहे त्याची तक्रार कोणाकडे करायची बाप्पा हे सांगशील का?
ह्या दणदणाटात आजारी, रूग्ण ह्यांची कोणी फिकीर करत असेल का? की सगळे जण आपल्याच मस्तीत असा ओंगळवाणा उत्सव साजरा करत राहणार? असले बेगडी स्वरूप असलेल्या ह्या उत्सवाची सांगता कशी होणार की हे असेच चालू राहणार? तक्रार कोणाकडे करायची बाप्पा हे सांगशील का?
जे घडतंय ते सगळे मन विषण्ण करणारे आहे. मुर्ती स्वरूपात असलेल्या हे बाप्पा !!! तुझ्यातले देवपण कुठेतरी हरवतयं ह्याची ना खेद ना खंत... ना ही कोणाकडे वेळ आहे. माझे नुकसान तर अनाहूतपणे झालेच असेल कदाचित पण अजूनही काही लोकांचे नुकसान
झाले असेल त्याची भरपाई ही थिल्लर तरूणाई
भरून देणार का?
व्हाॅटसअप वर फिरणारी ही पोस्ट बरंच काही सांगून जाते.
आज बाप्पा परतले
अन् पार्वती चाळतेय ग्रंथ... 🤗
कारण बाळाने प्रश्न विचारलाय 🤗🤗🤗
झिंगाट चा काय आहे अर्थ...
ता. क.- वर मांडलेल्या विचारात काही गणपती मंडळे अपवाद असतील
Saturday, September 3, 2016
आमचे बाप्पा...
गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया अशा आरोळ्यांनी आता गल्लोगल्ली बाप्पा विराजमान होतील. बाल गोपाळा पासून वृध्दापर्यत सर्वच जण तयारीला लागले आहेत. ह्या वर्षीचा बाप्पा आमच्या साठी खासच आहे त्याला कारणही तसेच आहे. ह्या वर्षी आम्ही आमच्या हाताने बनवलेली बाप्पाची मूर्ती बसवणार आहोत. गेली दहा वर्षे मी मातीतून निरनिराळे आकार, प्राणी असे बनवत आहे पण बाप्पाच्या वाटेला जायचे धाडस केले नाही. न जाणो काही चुकलेच तर मनात खट्टू व्हायला होईल असे वाटणे त्याच्या मागे असेल कदाचित पण मी हा ऊद्योग केलाच नाही पण ह्या वर्षी बायकोने फर्मान सोडले की गणपतीची मूर्ती घरीच करायची बाहेरून विकत आणायची नाही. हातात असलेल्या दिवसांचा हिशोब करता कमी कालावधीत हे सर्व ऊरकायला लागणार होते अन्यथा फसगत व्हायची वेळ येणार हे दिसत असताना मी हो म्हणून कामाला लागलो. माती विकत आणून ती भिजवून मळणे ह्यातच अर्धी अधिक ऊर्जा खर्ची पडल्याने आणि हाताला सवय नसल्यामुळे दोन दिवस हात दुखण्यात गेले. त्यानंतर मातीचे थर देऊन कुठला गणेश साकारायचा याचा विचार पक्का करून ठेवला होता. अर्थात अर्णव ची लुडबुड भलतीच अश्वासक होती किंबहुना माझ्या पेक्षा जास्त तोच हे सगळं धकवून न्यायला पुढे होता. बघता बघता मुर्तीने पाहिजे तसा आकार घेतल्याने हुरूप वाढला. आमचे मित्र विवेक कांबळे यांची पण त्यात मदत झाली. मूर्ती तयार झाल्यावर रंग संगती निश्चित करून त्याचे लेपण केले आणि खरोखरच एक सुंदर अनुभव घेत आम्ही बाप्पा ची मूर्ती साकारली. मागील वर्षी झालेल्या मूर्तीदान प्रकल्पाचा पगडा जाम होता त्यामुळे पूर्ण पाण्यात विरघळेल अशी मूर्ती बनवण्यात यशस्वी झालो ह्याचे आश्चर्य वाटले तद्वतच त्याचा निर्भेळ आनंद मनसोक्त लुटला. हे करत असताना माझे मन मात्र तीस वर्षे मागे गेले... जुन्या वाड्याच्या आठवणीने फेर धरला.. दहा वर्षांचा असल्या पासून "गणपती" ह्या विचाराने झपाटल्यगत होऊन आम्ही कामे करायचो शाळेतून आल्यावर मांडव टाकायची धांदल असायची. खलाचे लोखंडी बत्ते घेऊन खड्डे करायला ऊधाण आलेले असायचे, कामे वाटून दिलेली असायची. डेकोरेशन, वर्गणी, पुजा, रोजची आरती हे व इतर अनेक गोष्टी पूर्ण करायला वेळ नसायचा जणू . गोकुळअष्टमी झाली की अभ्यासाचा विसर पडायचा. गणपती मांडवात बसवे पर्यंत हे सगळं चालायचे. तुटपुंजी वर्गणी आणि त्यात दहा दिवसांचा उत्सव बसवण्यात कसब पणाला लागायचे. मंडळ गरीब असले तरी उत्साह तसूभरही कमी नसायचा. माझ्या घरच्या गणपतीची आरास हि एका दिवळीच्या बाजूने व्हायची कागदी पताका लावल्या जायच्या अर्थात त्यात बसेल एवढाच गणपती आणायचा असे अगोदरच आजीने बजावलेले असल्याने आम्ही मनातून खट्टू व्हायचो. गणपती आणायला मोठी माणसे जाणार कारण गर्दीत हरवायची भिती असायची. एक वर्षी मी शनवार वाड्याच्या भवताली असलेल्या स्टाॅलवर वडलांबरोबर फिरून दमून गेलो काही केल्या मूर्ती पसंत पडेना उन्हात फिरताना चांगलीच दमछाक झालेली अजूनही आठवतेय. पूर्ण वाड्यात एकच गणपती असल्याने सगळे जण आरतीला झाडून यायचे दिवाणखाना माणसांनी भरून जायचा. गणपती करीता आई गव्हाचे मोदक एका विशिष्ट प्रकारच्या पितळी मोदक पात्रात करायची त्याची चवही झक्कास. उरलेल्या सारणाचे कानवले ठरलेले असायचे. रात्री झोपताना दिवळीत गणपती जवळ लावलेला दिवा किती उबदार वाटायचा. घरात खरचं कोणी पाहुणा आलाय असे वातावरण तयार व्हायचे. त्या दिव्यामुळे एकदा पताका आणि काही वर्षांनी कॅलेंडर पेटल्याचे आठवतंय. एक वेगळीच धुंद, एक वेगळीच नशा गणपतीच्या दिवसात अनुभवायला मिळायची. विसर्जन मिरवणूकीला काहीशे मंडळ असल्याने ती पण न रेंगाळणारी आम्ही अनुभवलीय.मनसोक्त नाच, ढोल, ताशे हाच काय तो मिरवणुकीचा तामझाम...इतकं सगळं आठवत असताना मी अचानक भानावर आलो. भूतकाळातील सैरसपाट्याने मस्त वाटले आणि माझ्या बाप्पाला नमन करीत आजकालच्या हैदोशी वातावरणात फरक पडू दे रे बाबा हीच मागणी केली.
Saturday, August 27, 2016
नामाचा महीमा !!!
वेळ दुपारची साधारण चार ची
ठीकाण लक्ष्मी रोड
सिग्नल सुटायची वाट बघत जनता थांबलीये. पुण्यातील ट्राफिक मुळे जीव मेटाकुटीस आलेला आहे. गणपतीच्या खरेदी करीता टु व्हीलर धारक रस्ता मिळेल तिकडे सैरावैरा गाड्या हाकायच्या प्रयत्नात... मी देखील माझ्या कामाच्या ठिकाणी पोहचण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय इतक्यात एक अॅक्टीवा स्कुटर वर दोन शिडशिडीत चणीच्या दोन ललना (बहुधा पुण्याच्या नसाव्यात) बाजूला येऊन थांबत मला विचारतात...
एक्स क्युज मी ABC ला कसे जायचे?
मी.. (क्षणभर गोंधळात.. डोक्यात विचार .. हा कुठला नवा भाग... मेंदूत चाचपणी ????)
त्या...उत्तराची वाट बघतायेत..
मी... सावरून वाटेला लावायचे काम करतो..
तितक्यात सिग्नल सुटतो आणि माझ्या डोक्यात भुंगा...
लहानपण पुण्यात गेल्यामुळे असेल कदाचित पण ही अशी नावे कधी विचारच केली नव्हती.अप्पा बळवंत चौकाचे ABC हे नाव बहुधा परप्रांतीयांनी दिलेले असावे. पण नाही म्हणता ही फॅशन रूढ होत आहे. प्रत्येक नाव ठेवायच्या मागे काहीतरी इतिहास किंवा त्या त्या व्यक्तिला दिलेला सन्मान असतो. पण तिच्या तोंडून बाहेर आलेले इंग्रजाळलेले शब्द ऐकून कीव आली. शाॅट॔कट हा या पिढीला लागलेला रोग म्हणावा का इतपत विचार डोकावून गेला. पुर्वी मोबाईल हा प्रकार नसल्यामुळे पत्रात पूर्ण वाक्य लिहावी लागायची वीस पैशात मनातले सगळे त्या सरकारी छापील कागदावर लिहून झाल्यावर बरे वाटायचे तेव्हा जर हे असले फाजील शाॅट॔कट असते तर वाचणारा घेरी येऊनच पडला असता. अर्थात एकदा पत्रातला हा शहाणपणा मी वाचलाय.
लआमोनविवि .... खेळ खल्लास.. खूप विचाअंती कोडे उलघडले ते असे... लहानांना आशिर्वाद मोठ्यांना नमस्कार विनंती विशेष..
पण मजकूर लिहायला जागा कमी असते ह्या एका विचाराने माफ केले. पण इथे बोलताना पण शाॅट॔कट म्हणजे जरा अतीच झाले. मोबाईल वरील शाॅट॔कट लिहीणे म्हणजे कहर आहे. गेले एक तप मोबाईल वापरतोय पण ह्या असल्या जगड़व्याळ गोष्टी अजूनही समजण्याचा पलिकडल्या आहेत. तशीही पुण्यातील ठिकाणाची नावे खुमासदार त्यात हे असले बोलणे म्हणजे बालपण पुण्यात गेलेले आजोबा हे असलं ऐकून फेफरं येऊन पडतील. केपी (कोरेगाव पार्क ) पण त्यातलाच प्रकार. थोडक्यात काय तर येणाऱ्या काळात या असल्या गोष्टी कानी पडणार... होता होइल ते आपणच शहाणे व्हावे अन्यथा समोरची व्यक्ती आपल्याला येडछाप ह्या कॅटेगरीत अलगद नेऊन कधी ऊभी करेल ह्याचा नेम नाही.
Monday, August 22, 2016
सुंदर ते हात...
पी.व्ही.सिंधु च्या रौप्यपदकाच्या निमित्ताने द्वारकानाथ संझगिरीने पुलेला गोपीचंद वर लिहिलेल्या लेखातील काही भाग....
'सुंदर ते हात, ज्याला निर्मितीचे डोहाळे.’
सिंधूला घडवणारे हातही फार महत्त्वाचे आहेत. ते पुलेला गोपीचंदचे आहेत. या देशात चंद्रगुप्तएवढाच चाणक्य मोठा ठरतो. कारण गुरू-शिष्य परंपरेचं महत्त्व या आपल्या संस्कृतीत मुरलंय! हे पदक सिंधूइतकंच गोपीचंदचं आहे असं म्हणावं इतके परिश्रम त्याने घेतले आहेत. आपल्या देशाने काही महान खेळाडू निर्माण केले. त्यात एक गोपीचंद! त्याने 2001 साली ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकली. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप म्हणजे बॅडमिंटनचं विम्बल्डन! त्यापूर्वी एकाच भारतीयाने ती जिंकली होती तो म्हणजे प्रकाश पदुकोण. एकेकाळी जगात तो चौथ्या क्रमांकाचा खेळाडू होता. शीतपेयाची जाहिरात त्याच्याकडे एका मोठ्या चेकसकट चालत आली. त्यानं चक्क नाही म्हटलं. कोकची सवय लहान मुलांना हानिकारक म्हणून? तो क्रिकेटपटू नव्हता, लागोपाठ जाहिरातींच्या कॉण्ट्रक्टस मागे धावायला! ही काळ्या कपड्यातील लक्ष्मी नव्हती. ही शुभ्र कपड्यातली लक्ष्मी होती. त्यावर एक छोटासा डाग आहे असं त्याला वाटलं. त्याने तिला झिडकारलं! तो अचानक मनात वेगळ्याच जागी जाऊन बसला. फारशी लाडकी मंडळी तिथे जाऊन बसलेली नव्हती. मीसुद्धा त्यावेळी गोपीचंदच्या बुटात पाय घालून उभा असतो तर तसा वागलो असतो असं वाटत नाही. मी हुशारीने तो डागच नाही असं मनाला समजवलं असतं. माणूस मुखवटा चढवू शकतो. स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. पुढे दुखापतीमुळे त्याला लवकर निवृत्त व्हावं लागलं. त्याच्या या काळात त्याला लक्षात आलं की, भारतात अशा दुखापतींवर मात करून पुन्हा घट्टपणे उभं राहायच्या सुविधा नाहीत. त्याने देशाला, नशिबाला कुणाला दोष दिला नाही. त्याच्या डोक्यात क्रांतिकारी विचार आला. आपण त्या सुविधा निर्माण केल्या तर? भविष्यात एखाद्या गोपीचंदला कारकीर्दीवर पाणी सोडावं लागणार नाही. नवे दर्जेदार खेळाडूही तयार करता येतील. बा.भ. बोरकरांनी म्हटलंय, ‘‘सुंदर ते हात, ज्याला निर्मितीचे डोहाळे.’’
गोपीचंदच्या हाताला निर्मितीचे डोहाळे लागले म्हणून आपण सिंधू काय, श्रीकांत काय पाहतोय.
यापूर्वी अनेक खेळाडूंनी या देशात वल्गना केल्या आहेत- ‘‘जे खेळातून कमावलंय ते खेळाला परत द्यायचं!’’ काहींनी फक्त वल्गना केल्या. काहींनी प्रयत्न केले. काही आजही वल्गना करतायत. पण गोपीचंद प्रत्यक्षात ते करतोय. त्याचा दर्जा, त्याचा त्याग वेगळाच आहे. व्यावसायिकतेच्या वेगळ्याच स्तरावर तो उभा आहे. त्या स्तरावरचा दुसरा भारतीय खेळाडू मला कष्टाने शोधावा लागेल. त्याला आंध्र सरकारने हैदराबादच्या आयटी कॉरिडॉरमध्ये पाच एकर जागा स्वस्त दरात दिली. त्याच्या प्रोजेक्टचा खर्च होती तेरा कोटी! त्याने काही क्रीडाप्रेमी लक्ष्मीपुत्रांकडे मदत मागितली, पण त्याला फार यश आलं नाही. बॅडमिंटन म्हणजे ग्लॅमर असलेलं क्रिकेट नव्हे किंवा त्याला आयपीएलप्रमाणे ग्लॅमरस बाजार उभारायचा नव्हता. कोण कशाला पैसे देईल? गोपीचंदने आपलं घर गहाण ठेवलं आणि साडेतीन कोटी उभे केले. थोडक्यात, घरावरून नांगर फिरला जाण्याची मानसिक तयारी केली. मग निम्मा गुड्डा प्रसाद नावाचा बिझनेसमन त्याच्यामागे पाच कोटी घेऊन राहिला. त्याची अट एकच! ‘‘एक तरी ऑलिम्पिक मेडल जिंकून दे.’’ गोपीचंदने त्याला आता दोन मिळवून दिली. 2012ला सायना नेहवाल आणि आता सिंधू!
गोपीचंदची कहाणी इथे संपत नाही. इथून सुरू होते. सुविधा उभ्या राहिल्यावर जास्त कष्ट सुरू होतात. तो रोज सकाळी चार वाजता ऍकॅडमीत येतो. हे तो बारा वर्षे करतोय. सकाळचे पहिले तीन तास सिंधू-श्रीकांतसाठी असतात. सिंधूचा स्टॅमिना का चांगला? ती स्मॅश का चांगली मारते? ती शटलकॉकपर्यंत कशी पटकन पोहचते? तिचे गुडघे, खांदे वगैरे तिला इतकी सुंदर साथ का देतात? कारण मशिनगनमधून शटलकॉक कोर्टाच्या वेगवेगळय़ा ठिकाणी, विविध उंचीवरून आणि कोनातून टाकली जातात आणि सिंधू तिथे पोहचतेय हे तो पाहतो. एक तासाचा स्टॅमिना असावा आणि लाँग रॅलीज खेळून घणाघाती स्मॅश मारले पाहिजेत. त्यासाठी हा अट्टहास आहे. परवा उपांत्य फेरीत त्या जपानी मुलीवर सिंधूचे स्मॅश आगीच्या लोळासारखे कोसळले ना, त्यामागे ही मेहनत आहे. खरं तर त्या मेहनतीचा एकदशांश भाग असावा.
गेले काही महिने गोपीचंद स्वतः कार्बोहायडेट्स खात नाही. कारण यांच्याबरोबर सराव करायला त्याला फिट रहायचंय. सिंधूला तर चॉकलेट्स आणि हैदराबादी बिर्याणीपासून मैलभर लांब ठेवलंय. खेळाडूंचा नरसिंग यादव होऊ नये. कुणी घातपात करू नये म्हणून सिंधू-श्रीकांत यांना घराबाहेर पाणी प्यायला मनाई होती. देवाचा प्रसाद आणि तीर्थसुद्धा गोपीचंदने तिला घ्यायला दिलं नाही. त्याला माहीत आहे, अशा वेळी देव रागवत नाही. उलट प्रसन्न होतो. रिओत ती फक्त गोपीचंदबरोबर जेवू शकते आणि रिओत गोपीचंद पहाटे दोन वाजता उठतो. कारण त्याला आधीच्या मॅचचं तासभर ऍनॅलिसिस करायचं असतं. उगाच पदक विजेता तयार होत नाही! संगमरवरात कितीही मूलभूत सौंदर्य असलं तरी प्रत्येक दगडातून ताजमहाल उभा राहत नाही. ते घडवणारे हात बऱयाचदा अदृश्य असतात, पण ते महाल उभा करतात.
ते हात दिसावेत एवढाच हा प्रपंच.
लेखक - द्वारकानाथ संझगिरी.
यांच्या कडून साभार
अतिशय सुंदर असा हा लेख... एखाद्या खेळाडूमागे किती कष्ट त्याच्या प्रशिक्षकाने घेतले ह्याचा वस्तुपाठच घालून देतो. मुद्दाम संग्रही रहावा म्हणून मी माझ्या ब्लॉगवर प्रकाशित करतोय.
Sunday, August 21, 2016
वाह रे सिंधू... वाह रे साक्षी
तसा मी लहानपणा पासून ऑलिम्पिक खेळ बघतोय. साधारण ऐशी च्या दशकात माॅस्को ऑलिम्पिक वर आलेला एक सुंदर चित्रपटही मला बघितलेला स्वच्छ आठवतोय. त्या ऑलिम्पिक खेळाचा मस्काॅट असलेला अस्वल ज्याचे नाव "मिशा" होते हे ही अजुन विसरलो नाहीये. कारण त्या वेळी घराघरात टिव्ही नव्हते आजकालची चॅनेल संस्कृती तशी भारतीयापासून कोसो दूर होती.अगदीच गेलाबाजार सधन घरात एखादा कृष्ण धवल बाॅक्स टिव्ही असायचा आणि थोडक्यात दाखवलेल्या क्षणचित्रावर समाधान मानावे लागायचे. ऑलिम्पिक च्या खेळात पदकांच्या बाबतीत भारत हा सदैव दुर्दैवी ठरत आलेला देश हेच राहून राहून वाटायचे. खाशाबा जाधवांनी घेतलेल्या पदकाची माहीती ही फार ऊशीराने कळली. ऑलिम्पिक खेळ सुरू व्हायच्या वेळचे संचलन ही पर्वणीच असायची. विविध देशांतील खेळाडू ऐटीत चालताना बघून मस्त वाटायचे विशेषतः भारतीय संघ दाखल होत असताना ऊर अभिमानाने भरून यायचा. खेळ चालू असताना वेगवेगळ्या मासिकात आलेले फोटो कापून त्याचे कोलाज करून ठेवायचा छंद जडलेला असायचा. त्यातून सर्जी बुबका, जाॅयनर भगिनी, रशियन जिमनॅस्ट येलेना शुशकानोवा, पीट सॅमप्रास, ऑल टाईम फेवरिट गॅब्रीअला सबातिनी हे व इतर अनेक खेळाडू ओळखीचे होउन गेले ते अजून त्यांना विसरलो नाहीये.
आजच्या ह्या लेखाचा उद्देश खरतरं ह्याच्या शीर्षकात दडलाय. खेळ आणि भारतीयांचे जणू वाकडे असल्या सारखे वातावरण ह्या दोघींच्या यशानंतर ढवळून निघालेय. बघावे तिथे साक्षी- सिंधू झळकतायेत. मूलतः खेळ म्हणजे वेळेचा अपव्यय हा समज आपल्या घराघरांत पसरलेला आहे. अशा कर्मठ समाज मन असलेल्या देशातल्या ह्या दोघींचे यश खचितच उजवे ठरते. विविध देशांतून आलेल्या खेळाडू समोर कसब पणाला लावून पदक खेचून आणण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते त्याला तोड नाही. वर्तमान पत्रात आलेल्या बातम्या वरून त्यांनी घेतलेल्या श्रमाची काही टक्के माहीती होईलही कदाचित, पण एका साध्या
खेळाडू पासून सुरू झालेला हा प्रवास नक्कीच सोपा नसणार.... असंख्य मन दुखवणार्या घटनांचा सारीपाट त्याच्या मागे असणार.. कौटुंबिक पातळीवर मिळालेला हात तोच काय तर अश्वासक बाकी सगळं रामभरोसे.. खेळाकरीता असलेल्या संघटनांचे राजकारण हा तर कोणालाच न चुकलेला घटक.. कित्येक खेळाडूची वाटचाल ह्या मुर्दाड राजकारणा पायी खुरटते.. खेळाडू म्हटले की जिद्द, मेहनत ह्या गुणांचा गुणाकार करावाच लागतो अन्यथा हार गळ्यात पडलीच.. साक्षी काय सिंधू काय ह्या दोघी असल्या घुसमटून टाकणार्या व्यवस्थेतून गेल्या असणारच.. किंबहुना अशा महाभयानक व्यवस्थेचा भाग असून त्यांनी ज्या निकराने विजयश्री खेचून आणली ती खरचं कौतुकास्पद आहे. एकशे पंचवीस कोटी लोकसंख्या असलेल्या ह्या महान देशात दोन महीलांची ही पदक कमाई खरेच एका विशेष घडणार्या घटनांची नांदी आहे. छोट्या देशातील एकच धावपटू नऊ सुवर्ण पदकाची लयलूट करतो म्हणजे किती कमालीचा आत्मविश्वास घेऊन तो इथे आलेला असतो ह्याची कल्पना करवत नाही. माझ्या लहानपणा पासून पडलेला प्रश्न तरीही अनुत्तरित राहतो. कैक वर्षे पदकासाठी झगडावे लागणाऱ्या माझ्या भारत देशा पदकांचा हा दुष्काळ कधी संपेल का? टोकीओ ऑलिम्पिक खेळाची तयारी सुरू झाली म्हणे...
अशीच विजिगुषु मानसिकता माझ्या ही देशाला लाभो..
साक्षी- सिंधू सह अनेक नवीन तयार होणाऱ्या खेळाडूना मनापासून शुभेच्छा...