गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया अशा आरोळ्यांनी आता गल्लोगल्ली बाप्पा विराजमान होतील. बाल गोपाळा पासून वृध्दापर्यत सर्वच जण तयारीला लागले आहेत. ह्या वर्षीचा बाप्पा आमच्या साठी खासच आहे त्याला कारणही तसेच आहे. ह्या वर्षी आम्ही आमच्या हाताने बनवलेली बाप्पाची मूर्ती बसवणार आहोत. गेली दहा वर्षे मी मातीतून निरनिराळे आकार, प्राणी असे बनवत आहे पण बाप्पाच्या वाटेला जायचे धाडस केले नाही. न जाणो काही चुकलेच तर मनात खट्टू व्हायला होईल असे वाटणे त्याच्या मागे असेल कदाचित पण मी हा ऊद्योग केलाच नाही पण ह्या वर्षी बायकोने फर्मान सोडले की गणपतीची मूर्ती घरीच करायची बाहेरून विकत आणायची नाही. हातात असलेल्या दिवसांचा हिशोब करता कमी कालावधीत हे सर्व ऊरकायला लागणार होते अन्यथा फसगत व्हायची वेळ येणार हे दिसत असताना मी हो म्हणून कामाला लागलो. माती विकत आणून ती भिजवून मळणे ह्यातच अर्धी अधिक ऊर्जा खर्ची पडल्याने आणि हाताला सवय नसल्यामुळे दोन दिवस हात दुखण्यात गेले. त्यानंतर मातीचे थर देऊन कुठला गणेश साकारायचा याचा विचार पक्का करून ठेवला होता. अर्थात अर्णव ची लुडबुड भलतीच अश्वासक होती किंबहुना माझ्या पेक्षा जास्त तोच हे सगळं धकवून न्यायला पुढे होता. बघता बघता मुर्तीने पाहिजे तसा आकार घेतल्याने हुरूप वाढला. आमचे मित्र विवेक कांबळे यांची पण त्यात मदत झाली. मूर्ती तयार झाल्यावर रंग संगती निश्चित करून त्याचे लेपण केले आणि खरोखरच एक सुंदर अनुभव घेत आम्ही बाप्पा ची मूर्ती साकारली. मागील वर्षी झालेल्या मूर्तीदान प्रकल्पाचा पगडा जाम होता त्यामुळे पूर्ण पाण्यात विरघळेल अशी मूर्ती बनवण्यात यशस्वी झालो ह्याचे आश्चर्य वाटले तद्वतच त्याचा निर्भेळ आनंद मनसोक्त लुटला. हे करत असताना माझे मन मात्र तीस वर्षे मागे गेले... जुन्या वाड्याच्या आठवणीने फेर धरला.. दहा वर्षांचा असल्या पासून "गणपती" ह्या विचाराने झपाटल्यगत होऊन आम्ही कामे करायचो शाळेतून आल्यावर मांडव टाकायची धांदल असायची. खलाचे लोखंडी बत्ते घेऊन खड्डे करायला ऊधाण आलेले असायचे, कामे वाटून दिलेली असायची. डेकोरेशन, वर्गणी, पुजा, रोजची आरती हे व इतर अनेक गोष्टी पूर्ण करायला वेळ नसायचा जणू . गोकुळअष्टमी झाली की अभ्यासाचा विसर पडायचा. गणपती मांडवात बसवे पर्यंत हे सगळं चालायचे. तुटपुंजी वर्गणी आणि त्यात दहा दिवसांचा उत्सव बसवण्यात कसब पणाला लागायचे. मंडळ गरीब असले तरी उत्साह तसूभरही कमी नसायचा. माझ्या घरच्या गणपतीची आरास हि एका दिवळीच्या बाजूने व्हायची कागदी पताका लावल्या जायच्या अर्थात त्यात बसेल एवढाच गणपती आणायचा असे अगोदरच आजीने बजावलेले असल्याने आम्ही मनातून खट्टू व्हायचो. गणपती आणायला मोठी माणसे जाणार कारण गर्दीत हरवायची भिती असायची. एक वर्षी मी शनवार वाड्याच्या भवताली असलेल्या स्टाॅलवर वडलांबरोबर फिरून दमून गेलो काही केल्या मूर्ती पसंत पडेना उन्हात फिरताना चांगलीच दमछाक झालेली अजूनही आठवतेय. पूर्ण वाड्यात एकच गणपती असल्याने सगळे जण आरतीला झाडून यायचे दिवाणखाना माणसांनी भरून जायचा. गणपती करीता आई गव्हाचे मोदक एका विशिष्ट प्रकारच्या पितळी मोदक पात्रात करायची त्याची चवही झक्कास. उरलेल्या सारणाचे कानवले ठरलेले असायचे. रात्री झोपताना दिवळीत गणपती जवळ लावलेला दिवा किती उबदार वाटायचा. घरात खरचं कोणी पाहुणा आलाय असे वातावरण तयार व्हायचे. त्या दिव्यामुळे एकदा पताका आणि काही वर्षांनी कॅलेंडर पेटल्याचे आठवतंय. एक वेगळीच धुंद, एक वेगळीच नशा गणपतीच्या दिवसात अनुभवायला मिळायची. विसर्जन मिरवणूकीला काहीशे मंडळ असल्याने ती पण न रेंगाळणारी आम्ही अनुभवलीय.मनसोक्त नाच, ढोल, ताशे हाच काय तो मिरवणुकीचा तामझाम...इतकं सगळं आठवत असताना मी अचानक भानावर आलो. भूतकाळातील सैरसपाट्याने मस्त वाटले आणि माझ्या बाप्पाला नमन करीत आजकालच्या हैदोशी वातावरणात फरक पडू दे रे बाबा हीच मागणी केली.
अप्रतिम मित्रा
ReplyDeleteअप्रतिम मित्रा
ReplyDeleteThanks for your support and encouragement.
DeleteKudos Ajay! May lord bless you and your family with Peace Prosperity Success and happiness.
ReplyDeleteThnx a lot Prajakta for your words.
Delete