हातात कागदाचे पत्रकांचा गठ्ठा, दारात एक बाई उभ्या होत्या मी लगोलग ताडलेच की ह्यांना कुठल्या तरी उमेदवाराने कामास जुंपले आहे. निवडणुकीची हवा असल्याने त्यांना दारात पाहून मला अचंबा वाटला नाही किंबहुना त्या माउलीची किवच आली. परवाच कुठल्याशा एका नवीन उमेदवाराची शोभायात्रा दारावरून गेली त्या मागे हाsss तरूणांचा लोंढा निष्कारण गाड्यांचे कर्णकर्कश चित्रविचित्र हाॅर्न वाजवत अक्षरशः बोंबलत निघालेला पाहीला आणि त्या सर्व जीवांना मी मनातून भ च्या बाराखडीतील शिवीवचनं दिली. नगरसेवक पदा करिता असणारी ही निवडणूक यंदा मात्र उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या प्रत्येक माणसाची प्रतिष्ठा पणाला लावणारी वाटावी इतका गाजावाजा आणि मतदार राजावर अक्षरशः प्रचाराचा मारा करून एका नको वाटणार्या उंचीवर नेऊन ठेवलीय. नागरिकांच्या सहनशक्ती ची परिसीमा ह्या वेळी प्रचाराच्या नावाखाली बघितली गेली. एकमेकांवर कुरघोडी करण्यात हे उमेदवार पटाईत असावेत कारण वेगवेगळ्या माध्यमातून त्यांनी प्रचार थाटून नागरिकांच्या डोक्याची मंडई कशी होईल ह्याची पूर्ण तयारी केलेली दिसली. "तुलाच मत देतो बाबा पण हे नसते उद्योग आवर" असे म्हणायची पाळी आली होती. झेंडे मिरवायची विशेषतः कार समोर लावायची फॅशन ह्या वेळी प्रकर्षाने जाणवली. "पोलिस दल हतबल" असे घोषवाक्य पोलीसांसाठी बहाल करावेसे वाटते. निवडणूका बघितल्या आहेत पण एवढा आटापिटा पहील्यांदा बघायला मिळाला. बरं ह्यांना निवडून दिल्यावर ह्या लोकांनी केलेली कामे फत्रा दिसत नाहीत. नागरिकांच्या पैशाचा चुराडा आणि यंत्रणेतील लोकांची कसोटी ह्या निमित्ताने बघायला मिळते. हायटेक प्रचार होताना सभास्थानी पाठ फिरवलेल्या नागरिकांना धन्यवाद. अन्यथा त्या दिवशी पण वहातूक खोळंबा आणि बरीच चिडचिड ही होणारच होती. आज मतदानाची धामधूम संपलीय. मशीन मध्ये काही नशीबवान आणि कमनशिबी लोकांचा सत्तेच्या सारिपाठाची चाल बंद झालीय. आता निकाल लागल्यावर अजून ऊत येणार. तरूणाई कामधंदे सोडून परत झेंडे मिरवत उन्हात फिरणार. मिळाला तर वडापाव आणि सोय झालीच तर चषक रिते करून पूढच्या निवडणुका कशा गाजवायच्या ह्याची चर्चा होऊन पांगापांग होणार. आपण निवडून दिलेले प्रतिनिधी काळे होते का गोरे हे आपण विसरणार. ही साठमारी अशीच चालू राहणार. औट घटकेचा मतदार राजा पुनश्च आपल्या आयुष्याची लढाई लढणार. सोशल मिडियावर शेअर केलेले फोटो पुढच्या वर्षी आठवणीत येणार. पण आज बजावलेल्या कर्तव्याचे चीज झाले आहे का हे कळायला कुठे जायचे ह्याचे उत्तर शोधेपर्यत पुढील निवडणूकचे पडघम ऐकू येणार...
थोडक्यात काय तर मुकी बिचारी कोणीही हाका.....
Sunday, February 19, 2017
आव्वाज कुणाचा...
Subscribe to:
Post Comments (Atom)
Perfectly worded document
ReplyDeleteThank you very much
Delete