Thursday, July 28, 2016

मृत्यू : न टळणारी घटना

तसे  रोजच  कोणी  ना कोणी  स्वर्गवासी  होत  असते  पण कधी कधी  येणाऱ्या  बातम्यांनी  मन  कळवळते जाणारा  माणूस असंख्य प्रश्न  मागे  ठेवून  गेलेला  असतो. खुप  सार्‍या  लोकांना  काही  दिवस  चुकल्या  चुकल्या  सारखे  वाटते त्या  माणसा बरोबर  व्यतीत  केलेला  काळ  आठवतो. त्याच्या  लकबी  तर  काही  केल्या  मनातून  हटत  नाहीत. सवयीच्या  गुलामाना तर  जग  खायला  ऊठते. माणूस  गेल्यावर  त्याची  किंमत  कळलेली  असते. आयुष्यात पोकळी निर्माण  होणे  बहुधा  ह्यालाच म्हणतात.
माझ्या  करीता  माझ्या  आईचा  मृत्यू  चटका  लावणारा  ठरला. पहाटेच्या  धीरगंभीर  वातावरणात " अरे अजय,  आई वारली रे..." हे  माझ्या  वडीलांचे  ऐकलेले  शब्द  माझा  पिच्छा  सोडत  नाहीयेत. काळीज  चिरत  जाणारे  ते  शब्द  माझ्या  मेंदूत घर  करून बसलेत. आपल्या  सगळ्यांनाच  हा  असा  अनुभव  आलेला   असतो. ऐकायला नको वाटणारी  बातमी  कानावर  आली  की शब्द  हे  मणामणाचे  घाव  घालत असल्याचा भास होतो. कधी  प्रिय  व्यक्ती  जाते  म्हणून तर  कधी  अप्रिय  व्यक्ती  गेली  असे  ही  ऐकावे  लागते.  मृत्यू  ही  तशी  अप्रिय घटनाच आहे कारण  कोणालाही  ही  पृथ्वी  सोडून  जायची  इच्छा  नाहीये. आलेला  प्रत्येक जण  कधी  ना कधी तरी  जाणार  आहे  हे  साधे  तत्वज्ञान  लोकांना  पसंत  नाही. मला नाही  मरायचे  हा  धोशा  कायम  असतो. सगळ्या  गोष्टी  माणूस म्हणून जगताना  करून  घेतात पण  जेव्हा कोणाचा  अचेतन  देह पाहतात  तेव्हा  विचार  करतात  की  कुठे  जातो  हा  आत्मा  नावाचा  प्रकार  शरीर  सोडून... मी  गेल्यावर  असाच  अचेतन  पडून  राहणार  का? कसा  असेल  माझा  मृत्यू... अशा  असंख्य  प्रश्नाचे  भुंगे  डोके  पोखरून  टाकतात. पण  क्रियाकर्म  उरकले  की  मंडळी  सगळं  विसरून  अनुमस्तिषकावर अंमल  चढवायला  निघतात  ती  गेलेल्या  माणसाला  पोहचवल्यावर. 
म्हणूनच तर  भा. रा. तांबे यांनी  लिहूनच  ठेवलयं
जन पळभर  म्हणतील  हाय हाय..
मी  जाता  राहील  काय...

वरील  कवितेवरून मला काही  ओळी  सुचतात

जीवंत  असताना  करे  ना  हाय -बाय
मेल्यावर  काय  उपयोग  करून  हाय  हाय

घ्या रे  जगूनी जीवन  आपुले मरणावरची साय
मेल्यावर  काय   उपयोग  करून  हाय  हाय

अवतीभवती मनुष्य असता प्रेम  करणार  काय?
मेल्यावर  काय  उपयोग  करून  हाय  हाय

Monday, July 18, 2016

मन करा रे प्रसन्न

मन करा रे प्रसन्न ,सर्व सिद्धीचे कारण...
वा काय सुंदर ओळी आहेत ना...आपण खरेच  का हो आपले मन प्रसन्न ठेवतो.आजुबाजूला  बघितले तर फक्त धावपळच दृष्टीस पडते.. मगमनाचे  काय घेऊन बसलात सायबा... इथे  खाजवायला वेळ पुरत नाही आणि तुम्ही  प्रसन्न  मनाच्या काय बाता मारता... पण अनुभवातून  सांगतो जर का आपण सकारात्मक विचार  चालू ठेवले तर काय बिशाद नकारात्मक  गोष्ट  घडायची.. ह्या मनाचे जरा औरच असते  जसे पहा,  आपल्या शरीरात सर्व अवयव डॉक्टरांना सापडतात पण हा मन नावाचा अवयव  आजतागायत कोणी शोधू शकले नाही. कैक  वेळा  आपण  सहज  म्हणून  जातो  "माझ्या मनात एक विचार आला आहे" आलाय ना दाखव  की... पण हीच गोष्ट आहे की जी आपण ना  दाखवू शकतो  ना की नीट पणे सांगू शकतो. त्यामुळे  होते असे की वाईट वा चांगला  विचार हा ज्याचा  त्यालाच  कळतो. तेच  तर  वरील ओळीत अभिप्रेत आहे. आलेला  विचार हा सकारात्मक हवा  किंबहुना  मनाला  तशी  सवय  लावून घेता यायला हवी  जेणेकरून आपल्या  प्रत्येक पावलावर हेच  सकारात्मक विचार सदैव स्फूर्ती देत राहतील. खूपदा  एखाद्या कामात नकारघंटा वाजवायची  आपली सवय असते (माझे पण होते बर्‍याचदा) पण जर सुरवातीलाच होईल सगळं चांगलं  असा  विचार  मनात आणला तर अशक्य ते शक्य  व्हायला  वेळ लागत नाही. विचार उत्पन्न जिथे  होतो  तेच  शुध्द ठेवले तर काम फत्ते झालेच  म्हणून समजा. आपल्या विचारात किती  ताकद  असते  ह्याची एक गोष्ट आहे.
एक  वाटसरू  थकलेल्या  व घामाघूम  अवस्थेत  एका  झाडाखाली  विसाव्या  साठी  बसतो.  पहीला  विचार  येतो  तो " कीती  गरम  होतयं  मस्त  वार्‍याची झुळूक  पाहिजे.. लगेच झुळूक  येतेच... वा आता शांत  झोप पाहिजे... झोप ही  लागते ऊठल्यावर परत विचार.. खायला  मस्तपैकी पक्वान्न पाहिजे.. समोर ताट हजर.. जेवणावर ताव मारल्यावर  पुढचा  विचार... ही  भुताटकी  तर नाही  ना.. लगेच भूत हजर.. पुढचा  विचार  अरे हे मला मारणार तर नाही ना... मग  काय खेळ खल्लास... थोडक्यात काय तर  कल्पवृक्षाच्या छायेत बसून असे विचार व्यक्त केले तर अंत हा असाच होणार.. सार असे  आहे  की आपण सगळेच  कल्पवृक्षाच्या  छायेत  आहोत  फक्त सकारात्मक  विचार चालू ठेवले  तर  गोष्टीतल्या सारखी  आपली गत व्हायची नाही अन्यथा अंत हा ठरलेलाच...
माणूस नावाचे यंत्र निसर्गाची किमया आहे  आणि त्यात मन नावाची अदृश्य शक्ती त्या विधात्याने घातली की जी प्रत्येक जण अनुभवतो  पण त्याची  ताकद काय आहे हे त्या बिचार्‍या मानवाला आजतागायत कळले नाही.  खरेतर  नुसता  विचार  केल्यावर  कसे  काय चांगले  घडेल ह्या  संकल्पनेवर  विश्वास  बसणे  कठीण  असते  कारण  जो  पर्यंत  अनुभव  येत  नाही  तो  पर्यंत  कुठलाच  मनुष्य  त्या  त्या  गोष्टीवर  विश्वास  ठेवत  नाही.  पण  नुसत्या  विचारानेच  अद्भूत  गोष्टी  घडू शकतात. आपल्या  मनाला  त्याप्रमाणे शिक्षण  देणे हे  प्रथम  कर्तव्य  समजून सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.  आपले कार्य  हे विचार,  भावना  व  कृती  ह्या  त्रिसूत्रीवर  अवलंबून आहे.
कुठलाही  माणूस  ह्याच  त्रिकोणाचा भाग  असतो. आपली  झालेली  प्रत्येक  कृती  ही  फक्त  आणि  फक्त  विचार  आणि  भावना  ह्या  दोहोवर अवलंबून आहे. मनुष्याच्या प्रत्येक  कृती  मागे  हेच  दोघे  असतात. केलेली  कृती  एकतर  विचारातून  होते  अन्यथा  भावना  त्या  मागे  असतात... बघा  जरा  हा  thought, feeling, action  चा  त्रिकोण  समजतोय  का ?
आणि  सुरू  करा  आपल्या  मनाला  तयार  करायला  आणि  येणाऱ्या  क्षणाचा  सक्षमपणे  सामना करायला... आमेन

Thursday, July 14, 2016

विचारांचे महादान

परवाच  माझा  वाढदिवस  साजरा केला. तसा  मी  गेले  चव्वेचाळीस  वर्षे  तो  साजरा  करतोय पण  दरवेळी  काहीतरी  हटके  करूयात  ह्या उद्देशाला  माझ्या  कडून  हरताळ  फासला  जायचा. वाढदिवस  साजरा  करायच्या  लोकांच्या  तर्‍हा  पण  ढंगबाज असतात. खरंच  का हो  ह्या  दिवसाला  इतके  महत्व  द्यायलाच  हवे  का? मला  विचाराल तर  माझा  फंडा  साधा  आहे  आपण  मरणाच्या  जवळ  जातोय  तर  हा  दिवस  का  साजरा  करावा पण बाकीच्या  लोकांकडून  आलेल्या  शुभेच्छा  नाही  म्हणता  स्वीकारणे  क्रमप्राप्त होते  आणि  आपणा  सगळ्याचा  नाईलाज  होतो असो.... तर  प्रश्न असा  पडलाय  की  मी कसा  वाढदिवस  साजरा  केला.  अर्थातच  कसा  साजरा  करावा  हा  पूर्णतः  व्यक्ती  सापेक्ष  प्रश्न  आहे. ह्या  वेळी  मला  ती  संधी मिळाली  आणि  मी  तिला  सोडले  नाही. साधारण  23 वर्षांनंतर  मला  ही  संधी  प्राप्त झाली. होय  मी  बोलतोय  ते  खरं  आहे  मला  माझ्या  वाढदिवसाला  'रक्तदान'  करता  आले. फरक  एवढाच  होता  आधी  मी  बेधडक  जाऊन  माझे  रक्त  दान  केले  होते  ह्या  खेपेस  मला  थोडी  वाट पहावी लागली. उच्च  रक्तदाबाचा  निर्वाळा  डाॅक्टरांकडून  आल्याने  मला  थोडे  थांबून  ते  देता  आले  इतकेच. समाजात  राहून  फक्त  ओरबाडत  जगणे  म्हणजे  जगणे  होऊच  शकत  नाही. आपण  जन्माला  आल्यापासून  सर्व  समाज  घटकांकडून  घेत  आलेलो  असतो  तरी  देखील  मी  हे  मिळवलेयं ही  भावना   प्रत्येकाची  इतकी  प्रबळ  का  असावी याचा  आचंबा वाटतो. अगदी  तान्हे  असल्या  पासून  हे  अवलंबित्व  आपण  सर्व  जण अनुभवत  असतो पण  बेधुंद  जगण्याच्या  नादात  ह्याचा सोयीस्कर  विसर  पडतो. देणे  घेणे  हा  तर  मानवाचा  स्थायीभाव  ह्या  शिवाय  आपला  कुठलाही  व्यवहार  होत  नाही. पण  ह्यात  फक्त  घेणे  अपेक्षित  असते  का  हो... देणे कधीतरी  केलेच  तर  आत्मिक  आनंद  तर  मिळतोच  मिळतो पण  ह्या  धरेवर जगण्याला  अर्थ ही  प्राप्त होतो.  समाजातील  कित्येक  घटकांना  आपल्या  सारख्या  सामान्य  लोकांची  गरज  असते  फरक  इतकाच की  आपण  त्यांच्या  पर्यंत  कुठल्या  माध्यमातून  पोचतो. कालच  एका  पन्नाशीतल्या मैत्रीणी  बरोबर  बोलता बोलता  तिने  सहज  जाता  जाता  सांगितले  की  आता  उपेक्षित  घटकातील  लोकांना जेवढी  जमेल  तेवढी  मदत  करणार  त्यांना  स्वबळावर  उभे  राहण्यास  वाटा  उचलणार... किती  बरे  वाटले  तिचे  हे  विचार  ऐकून आणि  जाणवले की   अरेच्चा हे पण एक  देणेच आहे... आपल्या  कडे  देण्या सारखे  खूप  असते  फक्त  डोळसपणे विचार केला तर ते  काय  आहे  ह्याचा  उलघडा होतो. बरं  हे  करावे  तर  ह्याला  खिशाला  काही  चाट  पडते  का  तर ऊत्तर  येते नाही  कारण  फक्त  पैसे  देऊन  कुठलीही  समस्या  सुटते  का तर  परत  ऊत्तर  नाही  असेच  येते.  त्यामुळे  आपल्याला  जसे  जमेल  तसे  समाजाचे  पांग आपण  प्रत्येकाने फेडायचा प्रयत्न  करण्यास  काय हरकत  आहे.   मागच्याच  आठवड्यात  आम्ही  महादान हा  कार्यक्रम  आयोजित केला होता त्याला  उत्तम  प्रतिसाद  लाभला . लोकांनी  अक्षरशः  भरभरून  दान  केले  इतके  की  आमची  झोळी  फाटायची वेळ आली.  माझ्या  मनात  एकच  विचार,  की  इतके  अडगळीचे सामान  हे  लोक आणताहेत ह्यांच्या मनात  किती अनावश्यक विचार  अडगळ  होउन  ठाण मांडून बसले असतील. काढतो  का  त्यांना  पण  असेच  बाहेर...  करू  शकतो  का  ह्या   अनावश्यक  विचारांचे  महादान... जेणेकरून  आयुष्य सुरळीत  व  सुंदर  बनेल. किती  तरी  लोकांना  विचार  हे  डोक्यात  नाही  तर  कागदावर  ठेवायचे  असतात  ह्याचे  भानच  नसते मुळात. जसे  कपडे  कपाटात,  पाणी  माठात, लोणच्याची  बरणी  फडताळात  तसेच  विचार  हे  कागदावरच  उतरले  पाहिजे  ना की  आपल्या  डोक्यात....असो.

Monday, July 4, 2016

नेचर आतले आणि बाहेरचे

श्रावणमासी  हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर  शिरवे क्षणात फिरूनी  ऊन  पडे....
अतिशय सुंदर वर्णन केलेल्या बालकवींच्या  कविते प्रमाणेच आजूबाजूचा निसर्ग कसा  फुललाय. पावसाळा  आला की तो येताना  निसर्गरम्य नवनवीन छटा ही आपल्या सोबत  घेऊन येतो. मरगळलेल्या चराचरामध्ये नवचैतन्य  आणायचे कसब हे पाण्याच्या थेंबात असते. हिरवाईने नटलेल्या निसर्गाकडे एकटक बघत  बसावेसे वाटते. उंच डोंगरावरून खाली कोसळणाऱ्या पाण्याच्या प्रपाता प्रमाणे  आपल्याही मनात अनेक आठवणीचे हिंदोळे  हेलकावत असतात. जसे पेरलेल्या बीयांणामध्ये नवअंकुर फुटायची  ही  वेळ असते तद्वतच मानवी मनात साचलेल्या आशा निराशेचे मळभ झटकून  टाकायची ही वेळ असते.
श्रावणा पासून सुरू होणारी सणांची माळ दिवाळी  होई तो थांबत नाही. एकेक सणांचे  काय वर्णन करावे. ज्येष्ठ आणि बुजुर्गाना  आपल्या काळातील साजरा केलेल्या सणांची  आठवण येते तर आजकालची तरूणाई हे सण  आहेत ह्या पासून कोसो दूर असते. मोबाइल, इंटरनेट च्या जमान्यात कोणीतरी ह्यांना ह्या  सणांचे  असलेले  महत्त्व पटवून द्यायला  हवेय  अन्यथा हिंदू संस्कृती  लोप पावतेय ह्याचा टाहो  फोडण्याचा हक्क खचितच आपल्याला नाहीये. असो.
जसा निसर्ग हिरवाईचा शालू पांघरून बसतो  तसेच काहीसे  माणसांचे  होते  कारण आपण सहज  बोलता बोलता सांगून जातो " मेरा नेचर  ही ऐसा है"  पण आपल्याला हे कसे कळणार की  बाहेर निसर्ग आपला रखरखीत पणा सोडून  हिरवाई लपेटतो तसेच आपणही आपल्या  आतल्या नेचरला रखरखीत का बरे ठेवावे ?  होउ  दे त्याला ही हिरवागार... बागडू दे त्याला... भिजू  दे त्याला... करू दे कधीतरी अल्लडपणा... आजूबाजूच्या लोकांना काय वाटेल हा प्रश्न न पडता आपणही आपला आतला निसर्ग  हिरवागार करूयात.
श्रावणातल्या ह्या निसर्ग छटांचा  आस्वाद आपल्या अंतरंगातल्या निसर्गाला घेऊ देऊ यात. सज्ज होऊ आपणही आपल्या आतल्या  निसर्गाला हाक द्यायला त्यालाही जरा  हिरवागार करूया. आलेल्या प्रत्येक क्षणाचा  आनंद  घेऊ... आनंद  देऊ... आपल्या  आसपासच्या लोकांना आपल्या आतल्या  हिरव्यागार "नेचर" ची सैर घडवूया..