मन करा रे प्रसन्न ,सर्व सिद्धीचे कारण...
वा काय सुंदर ओळी आहेत ना...आपण खरेच का हो आपले मन प्रसन्न ठेवतो.आजुबाजूला बघितले तर फक्त धावपळच दृष्टीस पडते.. मगमनाचे काय घेऊन बसलात सायबा... इथे खाजवायला वेळ पुरत नाही आणि तुम्ही प्रसन्न मनाच्या काय बाता मारता... पण अनुभवातून सांगतो जर का आपण सकारात्मक विचार चालू ठेवले तर काय बिशाद नकारात्मक गोष्ट घडायची.. ह्या मनाचे जरा औरच असते जसे पहा, आपल्या शरीरात सर्व अवयव डॉक्टरांना सापडतात पण हा मन नावाचा अवयव आजतागायत कोणी शोधू शकले नाही. कैक वेळा आपण सहज म्हणून जातो "माझ्या मनात एक विचार आला आहे" आलाय ना दाखव की... पण हीच गोष्ट आहे की जी आपण ना दाखवू शकतो ना की नीट पणे सांगू शकतो. त्यामुळे होते असे की वाईट वा चांगला विचार हा ज्याचा त्यालाच कळतो. तेच तर वरील ओळीत अभिप्रेत आहे. आलेला विचार हा सकारात्मक हवा किंबहुना मनाला तशी सवय लावून घेता यायला हवी जेणेकरून आपल्या प्रत्येक पावलावर हेच सकारात्मक विचार सदैव स्फूर्ती देत राहतील. खूपदा एखाद्या कामात नकारघंटा वाजवायची आपली सवय असते (माझे पण होते बर्याचदा) पण जर सुरवातीलाच होईल सगळं चांगलं असा विचार मनात आणला तर अशक्य ते शक्य व्हायला वेळ लागत नाही. विचार उत्पन्न जिथे होतो तेच शुध्द ठेवले तर काम फत्ते झालेच म्हणून समजा. आपल्या विचारात किती ताकद असते ह्याची एक गोष्ट आहे.
एक वाटसरू थकलेल्या व घामाघूम अवस्थेत एका झाडाखाली विसाव्या साठी बसतो. पहीला विचार येतो तो " कीती गरम होतयं मस्त वार्याची झुळूक पाहिजे.. लगेच झुळूक येतेच... वा आता शांत झोप पाहिजे... झोप ही लागते ऊठल्यावर परत विचार.. खायला मस्तपैकी पक्वान्न पाहिजे.. समोर ताट हजर.. जेवणावर ताव मारल्यावर पुढचा विचार... ही भुताटकी तर नाही ना.. लगेच भूत हजर.. पुढचा विचार अरे हे मला मारणार तर नाही ना... मग काय खेळ खल्लास... थोडक्यात काय तर कल्पवृक्षाच्या छायेत बसून असे विचार व्यक्त केले तर अंत हा असाच होणार.. सार असे आहे की आपण सगळेच कल्पवृक्षाच्या छायेत आहोत फक्त सकारात्मक विचार चालू ठेवले तर गोष्टीतल्या सारखी आपली गत व्हायची नाही अन्यथा अंत हा ठरलेलाच...
माणूस नावाचे यंत्र निसर्गाची किमया आहे आणि त्यात मन नावाची अदृश्य शक्ती त्या विधात्याने घातली की जी प्रत्येक जण अनुभवतो पण त्याची ताकद काय आहे हे त्या बिचार्या मानवाला आजतागायत कळले नाही. खरेतर नुसता विचार केल्यावर कसे काय चांगले घडेल ह्या संकल्पनेवर विश्वास बसणे कठीण असते कारण जो पर्यंत अनुभव येत नाही तो पर्यंत कुठलाच मनुष्य त्या त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. पण नुसत्या विचारानेच अद्भूत गोष्टी घडू शकतात. आपल्या मनाला त्याप्रमाणे शिक्षण देणे हे प्रथम कर्तव्य समजून सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. आपले कार्य हे विचार, भावना व कृती ह्या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे.
कुठलाही माणूस ह्याच त्रिकोणाचा भाग असतो. आपली झालेली प्रत्येक कृती ही फक्त आणि फक्त विचार आणि भावना ह्या दोहोवर अवलंबून आहे. मनुष्याच्या प्रत्येक कृती मागे हेच दोघे असतात. केलेली कृती एकतर विचारातून होते अन्यथा भावना त्या मागे असतात... बघा जरा हा thought, feeling, action चा त्रिकोण समजतोय का ?
आणि सुरू करा आपल्या मनाला तयार करायला आणि येणाऱ्या क्षणाचा सक्षमपणे सामना करायला... आमेन
Monday, July 18, 2016
मन करा रे प्रसन्न
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment