तसे रोजच कोणी ना कोणी स्वर्गवासी होत असते पण कधी कधी येणाऱ्या बातम्यांनी मन कळवळते जाणारा माणूस असंख्य प्रश्न मागे ठेवून गेलेला असतो. खुप सार्या लोकांना काही दिवस चुकल्या चुकल्या सारखे वाटते त्या माणसा बरोबर व्यतीत केलेला काळ आठवतो. त्याच्या लकबी तर काही केल्या मनातून हटत नाहीत. सवयीच्या गुलामाना तर जग खायला ऊठते. माणूस गेल्यावर त्याची किंमत कळलेली असते. आयुष्यात पोकळी निर्माण होणे बहुधा ह्यालाच म्हणतात.
माझ्या करीता माझ्या आईचा मृत्यू चटका लावणारा ठरला. पहाटेच्या धीरगंभीर वातावरणात " अरे अजय, आई वारली रे..." हे माझ्या वडीलांचे ऐकलेले शब्द माझा पिच्छा सोडत नाहीयेत. काळीज चिरत जाणारे ते शब्द माझ्या मेंदूत घर करून बसलेत. आपल्या सगळ्यांनाच हा असा अनुभव आलेला असतो. ऐकायला नको वाटणारी बातमी कानावर आली की शब्द हे मणामणाचे घाव घालत असल्याचा भास होतो. कधी प्रिय व्यक्ती जाते म्हणून तर कधी अप्रिय व्यक्ती गेली असे ही ऐकावे लागते. मृत्यू ही तशी अप्रिय घटनाच आहे कारण कोणालाही ही पृथ्वी सोडून जायची इच्छा नाहीये. आलेला प्रत्येक जण कधी ना कधी तरी जाणार आहे हे साधे तत्वज्ञान लोकांना पसंत नाही. मला नाही मरायचे हा धोशा कायम असतो. सगळ्या गोष्टी माणूस म्हणून जगताना करून घेतात पण जेव्हा कोणाचा अचेतन देह पाहतात तेव्हा विचार करतात की कुठे जातो हा आत्मा नावाचा प्रकार शरीर सोडून... मी गेल्यावर असाच अचेतन पडून राहणार का? कसा असेल माझा मृत्यू... अशा असंख्य प्रश्नाचे भुंगे डोके पोखरून टाकतात. पण क्रियाकर्म उरकले की मंडळी सगळं विसरून अनुमस्तिषकावर अंमल चढवायला निघतात ती गेलेल्या माणसाला पोहचवल्यावर.
म्हणूनच तर भा. रा. तांबे यांनी लिहूनच ठेवलयं
जन पळभर म्हणतील हाय हाय..
मी जाता राहील काय...
वरील कवितेवरून मला काही ओळी सुचतात
जीवंत असताना करे ना हाय -बाय
मेल्यावर काय उपयोग करून हाय हाय
घ्या रे जगूनी जीवन आपुले मरणावरची साय
मेल्यावर काय उपयोग करून हाय हाय
अवतीभवती मनुष्य असता प्रेम करणार काय?
मेल्यावर काय उपयोग करून हाय हाय
No comments:
Post a Comment