विचारांची भाऊगर्दी डोक्यात झालीये.. पार पार मंडई झालीये डोक्यात. काय करावे कळत नाही. विचारांच्या भुंग्याने डोक्याचा पोखरून पोखरून पार फडशा पडलाय. नको ते विचार असे होऊन गेलेय. झोपेशी काडीमोड कधीच झालाय. डोळे सुजुन भप्प झालेत. कुठल्यातरी अनामिक भीतीने थरकाप होतोय. शरीरभर एक विदयुल्लता निष्कारण सैरभैर पळतीये असे भास होतायत. कशाचा कशाला पत्ता नाही तरी पण हे सगळे खेळ मनात चालू आहेत. उगाच मनाची भ्रामक समजूत घालण्यात माझा वेळ चाललाय...पण मन माझे काही केल्या ऐकण्याच्या मूड मध्ये नाहीये. ऊडाणटप्पू पणा वाढीस लागलाय. ह्या सर्वांना वेसन कशी घालू ह्याचा ऊलघडा होत नाहिये. विचारांच्या भाऊगर्दीत आशेचा किरण पार मिट्ट काळोखात दडून गेलाय असे का कोणास ठाऊक सारखे वाटते.
मानसिक खच्ची तर नाही ना झालोय... कपोलकल्पित गोष्टी माझा पाठलाग करतायत जणू... कपाळावर जखम असलेल्या अश्वथामा सारखी स्थिती निर्माण झाली आहे...भळभळणारी ही जखम कधीच भरून येणार नाही का?
मनाच्या या खेळाचा मी एकटाच शिकार झालोय की अजूनही बरीच जण ह्या अवस्थेतून गेलीयेत/ जातायत. विषण्ण करणार्या अनेक घटनांचा ताळेबंद लागता लागत नाही. उगाच सैरभैर अवस्थेतील मनाचा हा सारीपाट कधी आणि कसा ठाकठीक होइल ह्याचा ऊलघडा कधीच होणार नाही का ?
ग्रीष्म ऋतूत पानांची पानगळ होते तसे काहीसे झाले आहे. आकाशात काळ्या कुट्ट ढगांची जशी भाऊगर्दी व्हावी अगदी तसचं मळभ दाटून आल्या ची भावना वाढीस लागली असे वाटतेय..... बस. बस.. बस...
काय ! इतकं सगळं वाचून क्षणभर भांबावून गेला असाल ना !! खरतरं वर लिहीलेल्या मानसिक अवस्थेतून आपण सर्व जण जातो / गेलेलो असतो फरक इतकाच की मी लिहून त्याला वाचा फोडायचा प्रयत्न केला बस...
No comments:
Post a Comment