Saturday, March 11, 2017

अनुभवासाठी दाहिदिशा

दिवेलागण झालेली... संध्याकाळ आताशा रात्री  कडे झुकलेली... मी  रोज  सारखाच  दुकानात  बसून  काही  कामाचा  निपटारा  करण्यात  मग्न... अचानक  एक  तरूण  दुकानात  शिरला. दाढी  वाढलेली.. थोडे  तर्राट वाटणारे डोळे... अंगावर  नेहमी  प्रमाणे  डगलं चढवलेली... कपडे  बहुधा  दिवसांच्या  अंतराने  धुवत असावा...आत  येण्याची  परवानगी  घेऊन  माझ्यासमोर  बसला. नजर  भिरभिरती  असल्याने  मला  अंदाज आला  की  हे  गिर्‍हाईक  नाहीये. मी  विचारपूस केली  पण  तसे  त्याचे  नियोजन  नव्हते. एक  दोन  मिनिटाच्या  अंतराने  त्याने  मला  नोकरी  द्याल  का  असे  विचारले. हा  प्रश्न  माझ्या  करीता  जरा  वेगळा  असल्याने क्षणभर  गोंधळ  उडाला.
पण  सावरतच मी  त्याला  त्याची  माहिती  विचारली. हिंगणघाट चा  राहणारा हा  युवक  पुण्यात शिकायला  आलेला  होता. अभियांत्रिकी च्या  अभ्यासक्रमाच्या  शेवटच्या  वर्षाला  तो  शिकत  होता  पण  थोडे  अजून  पैसे  मिळतील  ह्या  आशेने  त्याने  माझ्याकडे  नोकरीची  विचारणा  केली होती.  मला  हे  सर्व  नवीन  होते. कारण  तगडे  शिक्षण  घेत  असताना  त्याला  नोकरी हवी  होती. मी  थोडी माहिती  काढायचा प्रयत्न केला तर तो  आत्ता  झालेल्या  निवडणुकीत  पण  काम  केले  होते  असे  म्हणाला  पण  पेमेन्ट  अजून  झाले  नाहीये  ही  देखील  वाढीव  माहिती  त्याने  मला पुरवली.  अभियंता म्हणून करिअर  करण्यासाठी येथे  आलेला  हा  तरूण  मला  आगतिक भासत  होता.  बरं पगाराची  पण  माफक  नाही  तर तगडी  अपेक्षा म्हणजे  मला  हे  विकतचं दुखणे. मी  त्याला  सांगतो  असे  थातूरमातूर  उत्तर  दिले. तसा  तो  उठून निघून  गेला. त्याच्या  पाठमोर्‍या  आकृती  कडे  बघत  मी  तरूणपणी केलेल्या  उचापती  आठवू  लागलो. शिक्षणाकरीता धडपडत केलेला  सगळा जीवन प्रवास झर॔कन डोळ्यासमोरून गेला. इथपर्यंत  पोहोचण्यात  ज्या  ज्या  घटकांचा  संबंध  आला  त्यांना  मनोमन  नमन केले. एवढे  शिक्षण  घेऊन  सुध्दा  आजकालच्या  पिढीला  कीती  आटापिटा  करावा  लागतोय ह्याचे  मनाला  वाईट  वाटले. त्या  व त्याच्या  सारख्या असंख्य  तरूणांना  सुयश  चिंतितो.

Sunday, February 19, 2017

आव्वाज कुणाचा...

हातात  कागदाचे  पत्रकांचा गठ्ठा, दारात  एक  बाई  उभ्या  होत्या मी  लगोलग  ताडलेच की  ह्यांना  कुठल्या तरी  उमेदवाराने  कामास  जुंपले आहे. निवडणुकीची  हवा  असल्याने  त्यांना  दारात  पाहून  मला  अचंबा  वाटला नाही  किंबहुना  त्या  माउलीची किवच आली. परवाच  कुठल्याशा  एका  नवीन  उमेदवाराची  शोभायात्रा  दारावरून  गेली  त्या  मागे  हाsss तरूणांचा लोंढा  निष्कारण  गाड्यांचे  कर्णकर्कश  चित्रविचित्र हाॅर्न वाजवत  अक्षरशः  बोंबलत  निघालेला  पाहीला  आणि त्या  सर्व  जीवांना मी  मनातून  भ च्या  बाराखडीतील  शिवीवचनं दिली. नगरसेवक  पदा करिता  असणारी  ही निवडणूक  यंदा मात्र  उमेदवार म्हणून उभे राहिलेल्या  प्रत्येक  माणसाची  प्रतिष्ठा पणाला लावणारी  वाटावी  इतका गाजावाजा  आणि  मतदार  राजावर  अक्षरशः  प्रचाराचा  मारा करून  एका नको  वाटणार्‍या  उंचीवर नेऊन ठेवलीय. नागरिकांच्या सहनशक्ती  ची परिसीमा  ह्या वेळी  प्रचाराच्या नावाखाली  बघितली  गेली. एकमेकांवर  कुरघोडी  करण्यात  हे  उमेदवार  पटाईत  असावेत कारण  वेगवेगळ्या  माध्यमातून  त्यांनी  प्रचार  थाटून  नागरिकांच्या डोक्याची  मंडई  कशी  होईल  ह्याची  पूर्ण  तयारी  केलेली  दिसली. "तुलाच  मत  देतो  बाबा  पण  हे  नसते  उद्योग  आवर" असे  म्हणायची  पाळी आली होती. झेंडे  मिरवायची  विशेषतः  कार  समोर  लावायची  फॅशन  ह्या  वेळी प्रकर्षाने  जाणवली. "पोलिस दल हतबल"  असे  घोषवाक्य  पोलीसांसाठी बहाल करावेसे  वाटते. निवडणूका बघितल्या आहेत  पण  एवढा  आटापिटा  पहील्यांदा बघायला  मिळाला. बरं  ह्यांना  निवडून  दिल्यावर  ह्या लोकांनी  केलेली  कामे  फत्रा दिसत  नाहीत. नागरिकांच्या  पैशाचा  चुराडा  आणि  यंत्रणेतील  लोकांची  कसोटी  ह्या  निमित्ताने  बघायला  मिळते. हायटेक  प्रचार  होताना  सभास्थानी  पाठ  फिरवलेल्या  नागरिकांना  धन्यवाद. अन्यथा  त्या  दिवशी  पण वहातूक खोळंबा आणि बरीच चिडचिड ही  होणारच  होती. आज मतदानाची धामधूम  संपलीय. मशीन मध्ये काही नशीबवान  आणि  कमनशिबी  लोकांचा सत्तेच्या सारिपाठाची चाल  बंद  झालीय. आता निकाल  लागल्यावर  अजून  ऊत  येणार. तरूणाई कामधंदे  सोडून परत  झेंडे  मिरवत  उन्हात  फिरणार. मिळाला  तर वडापाव  आणि  सोय झालीच तर चषक रिते करून  पूढच्या निवडणुका कशा गाजवायच्या ह्याची  चर्चा होऊन पांगापांग होणार. आपण निवडून  दिलेले प्रतिनिधी काळे होते का गोरे हे आपण  विसरणार. ही साठमारी अशीच चालू राहणार. औट घटकेचा मतदार राजा पुनश्च आपल्या  आयुष्याची लढाई लढणार.  सोशल मिडियावर शेअर केलेले फोटो पुढच्या वर्षी आठवणीत  येणार. पण आज बजावलेल्या कर्तव्याचे चीज झाले आहे का  हे कळायला कुठे जायचे ह्याचे  उत्तर  शोधेपर्यत पुढील  निवडणूकचे पडघम ऐकू  येणार...
थोडक्यात  काय  तर  मुकी  बिचारी  कोणीही   हाका.....

Thursday, February 9, 2017

चूटपूट...

प्रसंग एक-

मी  कामात  गर्क  आहे. दुकानात  अजूनही  बाकीचे  लोक  काम  करतायेत.  पसारा  हा  दिसतोय  पण  काम  पूर्ण झाल्यानंतरच त्याला  हात  लावता  येणार हा  विचार  येतो न येतो  तोच  मागून  एक  पोरगेलासा आवाज...
ओ भाव... ओ भाव..
मी  कामातून  डोके  बाहेर  काढत  त्याला  विचारले " काय  पायजे"
हा  एवडा फाम भरून  द्याल काय..
दहा  वर्षांचा  मुलगा  लाल भडक  रंगाचा  शर्ट  घालून  माझ्याकडे  बघत  होता. मागे  एक  ऐशी च्या  आसपास  पोहोचलेले आजोबा  जाड  भिंगाच्या चष्म्यातून  माझ्या  प्रतिसादाची वाट  पहात  होते. चष्म्याच्या  दोन्ही  काड्या  बांधून  ठेवायला  दोरा  गुंडाळला  होता. पायात  मळकट  धोतर, अंगात सदरा बहुतेक  बाहेर  गावचे  असावेत असा  अंदाज  मी  लावला. त्या  मुलाला  मी  विचारले " शाळेत  जातोस  ना मग  हा  फार्म  भरता  येत  नाही  का  तुला? तर  त्याने  नकारार्थी मान हलवली.  बाजूला  बॅक  असल्याने  हे  नवीन  नव्हते  मला.  मी  त्याला  आत  बोलावून  नाव  विचारले  तर  त्याने  सांगितले " "विजय  कानकात्रे"
कुठचा  रे तु?  माझा  पुढचा  प्रश्न !!
मी... बीडचा पण  आता  र्‍हायला पुन्यातच. शाळत सांगितलय  हीथ अकाउंट  काढायला, माझे  गणवेशाचे पैसे  जमा होणारेत डायरेक्ट...
बरं बरं... असं  म्हणत  मी  त्याचा  फाॅर्म  भरून  द्यायला  सुरवात  केली. कसा  भरतात  हे  देखील  त्याला  दाखवले. पाचच  मिनिटात  हे  सर्व  उरकले  तो  निघाला तसा  त्याने  मला  पुढचा फाॅर्म भरायला  पेन  मागितले पण  दुकानात  गडबड  असल्याने  मी  "बॅकेत बघ" असा  सल्ला  देत  पिटाळला.. यथावकाश  कामे  संपवून मी  बाहेर  पडलो  आणि  सहजच  विचार  डोकावला  की  अरे  मी त्याला  पेन  देऊनच  टाकायला  हवे होते. तेवढीच  त्याची एक  विवंचना  हलकी  झाली  असती.. पण  विचाराच्या  तंद्रीत  मी  एक  छोटे  सत्कर्म  करायचे विसरलो..

प्रसंग  दोन
मी  बुलेट वर  स्वार... रस्ता कापतोय.. अचानक  समोर  चारचाकी  वाहने  रस्त्यावर  काहीतरी  पडल्याने  वळसा  घालतायत. क्षणभर  मनात  विचारांचे  वादळ.. काय  बघायला  मिळेल  काही  शाश्वती  नाही. एवढा  होइतो मी  तिथपर्यंत  पोहोचतो ... आणि  बघतो तर  काय  रस्त्यावर  एक  झाडाची  डहाळी पडलीय  की  जी   नुकसान  करेल  इतपत  मोठी  आहे.. अरे..अरे..अरे.. हे  काय  मी  ही  त्याला  वळसा  घालून  माझा  रस्ता  धरलाय. ती  डहाळी मी  बाजूला  करताना  स्वतःला फक्त  विचारात   बघतोय ... मी पण  तसाच  पुढे  जातो... डहाळी तशीच...वाहतूक  तशीच  वळसेदार.. मी  मात्र  घाईत  निघालेला  एक  निष्क्रिय प्राणी...

वरील दोन्ही  प्रसंगात  काहीतरी  बदल  घडवता  आला  असता  पण  विचारचक्रात अडकून  काहीही  घडले  नाही. इथून पुढे  तरी  प्रसंगावधान घडो  हीच  मनोकामना....

आमेन

Saturday, October 8, 2016

कथा शहंशाहच्या भेटीची

साल  असावे  2011.. सिंबायोसिस  च्या  एका  संस्थेत  सेवा  बजावत  असताना  आलेला  हा  योग  कधी  न विसरण्या सारखा. त्या  वेळी  कौन  बनेगा करोडपती  चा  दुसरा  सीजन चालू  झाला  होता.  प्रेक्षक  संख्या जास्त  दिसावी  ह्या  करीता मिडिया  च्या  विद्यार्थ्याना पाचारण केले  जाते...का तर, पुढील काळात  त्यांना  असे  कार्यक्रम  तांत्रिक  अनुषंगाने  कळावेत.  पुण्याहून  सकाळी लवकर  निघून  गोरेगाव  येथे  पोहोचण्यास  वेळ  लागलाच. दादासाहेब फाळके  चित्रनगरीत सोळा  नंबर  स्टुडिओत  आमची  जेवणाची  व्यवस्था  सोनी  वाहीनी तर्फे  केलेली  होती. आमच्या  आधीच  काही  मंडळी  येऊन  थांबली होती  प्रत्येकाला आत  सेटवर  कधी  जातो  असे  झाले  होते. बच्चन  सरांना  बघता  येणार  ते ही  याचि देही  याचि डोळा... दुग्धशर्करा योग  आला  होता.  दोनेक  च्या  सुमारास  आत  जायचा  पुकारा  झाला आणि  गारेगार  वातावरणात  प्रवेश  करते झालो. नजर  भिरभिरत  सरांना  शोधत होती  पण  तेच  दिसत  नव्हते. वाहीनी ची लोक  स्पर्धकांना  टिप्स  देण्यात  मग्न होते. अधूनमधून सेट  स्वच्छ  दिसण्या करिता  पोछा मारायचे  काम केले  जात  होते. आम्हाला  पण  कसे  हसायचे आणि  कशाप्रकारे  टाळ्या  पिटायच्या ह्याची  तयारी  करवून  घेतली  गेली. सूत्रबद्ध  आणि  शिस्तीत  काम  चालू होते.  हे  सगळं  होऊस्तोवर पाच  कधी  वाजले  कळलेच नाही  तेवढ्यात  दस्तुरखुद्द अमिताभ बच्चन यांचे  आगमन  झाले.  आणि  सुरू  झाला  एक  रोमांचक  शो जो  इतके दिवस  टिव्हीवर  पहात  आलो होतो....तो  आज  समोर  घडताना  बघत होतो  एका  अचाट  शक्तीचा  अनुभव  घेत  होतो. व्यावसायिक  कलाकार  म्हणजे  काय  हे  तिथेच  कळले.  सेटवरचा माहोल  इतका बदलला  की  सर्व जण  तल्लीन  होऊन गेले. त्यांनी आलेल्या  प्रेक्षकांशी संवाद  साधत  ही  कामगिरी  लिलया पार  पाडली. नेटके  आयोजन  तितकाच  ताकदीचा  कलाकार  हा  योग  मस्त  जुळून  आला  होता. मध्येच  एक  पावसाची  जोरदार  सर  आल्याने  चक्क  शुट थांबले  कारण  वरच्या  पत्र्यावर  वाजणारा  आवाज  काहीसा  भयावह  होता. पण  नंतर  सर्व काही  सुरळीत पार पडले. कार्यक्रम  संपल्यावर  बच्चन  सर  स्वतः येऊन  प्रेक्षका बरोबर  फोटो  काढून  घेत  होते.  सुंदर  असा  हा  पाच  तासांचा  प्रवास  संपल्यावर  मनाला  हुरहूर  लागुन  राहीली  आता  परत  कधी  हा  योग  पुन्हा  येणार  नाही  ह्याची. ते  पाच  तास  खरतरं आयुष्यातील  सुखद अनुभव  म्हणून  मी  जपून  ठेवले  ते  कायमचेच...

Friday, September 16, 2016

कोणास करू तक्रार बाप्पा !!!

विसर्जना नंतरचा  दुसरा  दिवस सकाळी  नेहमीच्या  वेळी  मी  शोरूम  उघडले  आणि  माझा  माझ्या  डोळ्यांवर  विश्वास  बसला  नाही. परवा  सगळं  ठाकठीक  ठेवलेल्या  वस्तूंची  जागा  बदललेली  होती . एक  काचेची  फ्रेम  खाली  पडून  फुटलेली.. ट्राॅफी  वरून पडून  चक्काचूर.. मी  शेजारी  चौकशी  केली   तर  धक्कादायक  बाब म्हणजे  डीजे  च्या  दणदणाटाने  झालेला  हा  प्रताप हे  ऐकून  माझ्या  मस्तकात  रागाची ठिणगी  पडली.... मी  शिव्यांची  लाखोली  वाहात  असताना  माझ्या  कानात.... प्रथम  तुला  वंदीतो कृपाळा ... गजानना गणराया  चे  स्वर  ऐकू  येउ  लागले... पूर्वी  साजरा  होत  असलेल्या  या  उत्सवाचे बीभत्स  उत्सवात  होत  असलेले  परिवर्तीत रूप  क्लेशदायकच म्हणायला  हवे..
बाप्पाची मिरवणूक  काढून  धमाकेदार  विसर्जन  करण्यात आले. दहा  दिवसांचा  उत्सव  संपला.   पुण्यातील  व पुण्याच्या  आजूबाजूला  असलेल्या  गावातील लोकांना  एक  पर्वणीच  होती. सर्वांनी  धमाल  केली. दरवर्षी  प्रमाणे  ह्या  ही  वर्षी  चैन पडत  नसताना  बाप्पाचा  निरोप  घ्यावा  लागला. बर्‍याच फुकट्यांना  लाईट्स  आणि  डीजे  च्या रटाळ , तद्दन  गाण्यावर  नाचून भरून  पावल्याची  अनुभुती  मिळाली  असेल.  आपण  एका  बुध्दीच्या देवासमोर  मुन्नी ला बदनाम  करत, डीजे च्या आईला शिव्या घालत, झिंगाट नाचून,  सैराट झाल्याची भावना  सुखावून  गेली  असेल. टिळकांनी सुरू केलेल्या  ह्या  बुध्दीच्या देवाच्या लोकोउत्सवाचे  आता  नकोउत्सवात रूपांतर होतेय  असेच  वाटते.  कोणाचे  मंडळ  कीती  भारी , आरास, डीजे  ह्यावर  होणारा  हा  खर्च  टाळून  समाजोपयोगी  कार्य  करणारी  किती  मंडळे  असतील  हे  देवबाप्पाच जाणो. इतकी  तरूणाई ह्या  धूडगुस तालावर  थिरकत  असताना  समाजातल्या  असंख्य  प्रश्नाची  ह्याना  कल्पना  असते  का  असा  प्रश्न पडल्यावाचून रहात  नाही. पण  जे काही  चालू  आहे  त्याची  तक्रार  कोणाकडे  करायची  बाप्पा  हे  सांगशील  का? 
ह्या दणदणाटात आजारी, रूग्ण ह्यांची  कोणी  फिकीर  करत  असेल  का? की  सगळे जण  आपल्याच  मस्तीत  असा  ओंगळवाणा  उत्सव  साजरा  करत  राहणार? असले  बेगडी  स्वरूप  असलेल्या ह्या  उत्सवाची सांगता  कशी  होणार  की  हे  असेच  चालू राहणार?  तक्रार  कोणाकडे  करायची  बाप्पा  हे  सांगशील का?
जे  घडतंय  ते  सगळे  मन  विषण्ण  करणारे  आहे.  मुर्ती स्वरूपात असलेल्या हे बाप्पा !!!  तुझ्यातले देवपण कुठेतरी हरवतयं  ह्याची  ना  खेद ना खंत... ना ही कोणाकडे  वेळ आहे.  माझे नुकसान तर अनाहूतपणे  झालेच असेल  कदाचित पण अजूनही काही लोकांचे नुकसान
झाले असेल त्याची भरपाई ही थिल्लर तरूणाई
भरून देणार का?

व्हाॅटसअप वर  फिरणारी  ही  पोस्ट  बरंच काही सांगून जाते.

आज बाप्पा परतले    
अन् पार्वती चाळतेय ग्रंथ...                    🤗
कारण बाळाने प्रश्न विचारलाय       🤗🤗🤗 
झिंगाट चा काय आहे अर्थ...              

ता. क.- वर मांडलेल्या  विचारात  काही  गणपती  मंडळे अपवाद  असतील

Saturday, September 3, 2016

आमचे बाप्पा...

गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती  मोरया  अशा  आरोळ्यांनी  आता  गल्लोगल्ली  बाप्पा  विराजमान  होतील. बाल  गोपाळा पासून  वृध्दापर्यत  सर्वच जण  तयारीला  लागले आहेत.  ह्या  वर्षीचा  बाप्पा  आमच्या  साठी  खासच  आहे  त्याला  कारणही  तसेच  आहे. ह्या वर्षी  आम्ही  आमच्या  हाताने  बनवलेली  बाप्पाची  मूर्ती  बसवणार  आहोत. गेली  दहा  वर्षे  मी  मातीतून  निरनिराळे  आकार, प्राणी  असे  बनवत  आहे  पण  बाप्पाच्या  वाटेला  जायचे  धाडस केले नाही. न जाणो  काही  चुकलेच  तर  मनात  खट्टू  व्हायला  होईल  असे  वाटणे  त्याच्या  मागे  असेल  कदाचित पण मी  हा  ऊद्योग  केलाच  नाही  पण  ह्या  वर्षी  बायकोने  फर्मान सोडले  की  गणपतीची  मूर्ती  घरीच  करायची  बाहेरून  विकत  आणायची  नाही.  हातात  असलेल्या  दिवसांचा हिशोब  करता  कमी  कालावधीत  हे  सर्व  ऊरकायला लागणार  होते  अन्यथा  फसगत  व्हायची  वेळ  येणार  हे  दिसत  असताना  मी  हो  म्हणून  कामाला  लागलो. माती  विकत  आणून  ती  भिजवून  मळणे  ह्यातच अर्धी  अधिक  ऊर्जा  खर्ची पडल्याने  आणि  हाताला  सवय  नसल्यामुळे  दोन दिवस  हात  दुखण्यात गेले. त्यानंतर  मातीचे  थर  देऊन  कुठला  गणेश  साकारायचा  याचा विचार  पक्का  करून  ठेवला  होता.  अर्थात  अर्णव ची लुडबुड  भलतीच  अश्वासक होती  किंबहुना  माझ्या  पेक्षा जास्त  तोच  हे  सगळं  धकवून न्यायला  पुढे  होता. बघता बघता मुर्तीने  पाहिजे  तसा  आकार  घेतल्याने  हुरूप  वाढला. आमचे  मित्र  विवेक  कांबळे  यांची  पण  त्यात  मदत  झाली. मूर्ती  तयार  झाल्यावर  रंग  संगती  निश्चित  करून  त्याचे  लेपण केले  आणि खरोखरच  एक  सुंदर  अनुभव  घेत  आम्ही  बाप्पा  ची मूर्ती  साकारली. मागील वर्षी  झालेल्या  मूर्तीदान प्रकल्पाचा  पगडा  जाम  होता  त्यामुळे  पूर्ण  पाण्यात  विरघळेल अशी  मूर्ती  बनवण्यात  यशस्वी झालो ह्याचे  आश्चर्य वाटले तद्वतच  त्याचा  निर्भेळ  आनंद  मनसोक्त  लुटला. हे करत  असताना  माझे  मन  मात्र  तीस  वर्षे  मागे  गेले... जुन्या  वाड्याच्या  आठवणीने  फेर धरला.. दहा  वर्षांचा  असल्या पासून  "गणपती" ह्या  विचाराने  झपाटल्यगत  होऊन  आम्ही  कामे  करायचो शाळेतून  आल्यावर  मांडव  टाकायची  धांदल  असायची. खलाचे लोखंडी  बत्ते घेऊन  खड्डे  करायला  ऊधाण आलेले  असायचे, कामे  वाटून  दिलेली  असायची. डेकोरेशन, वर्गणी, पुजा, रोजची  आरती हे  व  इतर  अनेक  गोष्टी  पूर्ण  करायला  वेळ  नसायचा  जणू . गोकुळअष्टमी झाली  की  अभ्यासाचा  विसर  पडायचा. गणपती  मांडवात  बसवे पर्यंत  हे  सगळं  चालायचे. तुटपुंजी  वर्गणी  आणि  त्यात  दहा  दिवसांचा  उत्सव  बसवण्यात  कसब  पणाला  लागायचे. मंडळ  गरीब  असले  तरी  उत्साह तसूभरही  कमी  नसायचा.  माझ्या घरच्या  गणपतीची आरास  हि  एका  दिवळीच्या बाजूने व्हायची कागदी पताका लावल्या जायच्या अर्थात  त्यात बसेल  एवढाच  गणपती  आणायचा असे अगोदरच  आजीने बजावलेले असल्याने  आम्ही मनातून  खट्टू  व्हायचो. गणपती  आणायला  मोठी  माणसे  जाणार  कारण गर्दीत हरवायची भिती  असायची. एक  वर्षी मी  शनवार वाड्याच्या  भवताली  असलेल्या स्टाॅलवर वडलांबरोबर फिरून  दमून  गेलो काही केल्या मूर्ती पसंत  पडेना  उन्हात  फिरताना चांगलीच दमछाक झालेली  अजूनही  आठवतेय. पूर्ण  वाड्यात एकच  गणपती असल्याने सगळे जण आरतीला  झाडून यायचे दिवाणखाना माणसांनी  भरून  जायचा. गणपती  करीता  आई  गव्हाचे  मोदक  एका  विशिष्ट  प्रकारच्या  पितळी  मोदक  पात्रात  करायची  त्याची  चवही  झक्कास. उरलेल्या  सारणाचे  कानवले ठरलेले  असायचे. रात्री  झोपताना  दिवळीत गणपती  जवळ  लावलेला  दिवा  किती  उबदार  वाटायचा. घरात खरचं  कोणी  पाहुणा  आलाय  असे  वातावरण  तयार  व्हायचे. त्या  दिव्यामुळे एकदा  पताका  आणि  काही  वर्षांनी  कॅलेंडर  पेटल्याचे आठवतंय. एक  वेगळीच  धुंद, एक  वेगळीच  नशा  गणपतीच्या दिवसात  अनुभवायला  मिळायची. विसर्जन  मिरवणूकीला काहीशे मंडळ असल्याने ती  पण  न रेंगाळणारी  आम्ही  अनुभवलीय.मनसोक्त  नाच, ढोल, ताशे हाच काय तो मिरवणुकीचा  तामझाम...इतकं  सगळं आठवत असताना  मी   अचानक भानावर आलो. भूतकाळातील  सैरसपाट्याने मस्त  वाटले आणि माझ्या बाप्पाला नमन करीत आजकालच्या हैदोशी वातावरणात फरक पडू दे रे बाबा हीच मागणी केली.

Saturday, August 27, 2016

नामाचा महीमा !!!

वेळ  दुपारची  साधारण  चार ची
ठीकाण लक्ष्मी रोड
सिग्नल  सुटायची वाट बघत  जनता थांबलीये. पुण्यातील  ट्राफिक मुळे  जीव  मेटाकुटीस  आलेला  आहे. गणपतीच्या  खरेदी  करीता टु व्हीलर  धारक  रस्ता  मिळेल  तिकडे  सैरावैरा  गाड्या  हाकायच्या प्रयत्नात... मी  देखील  माझ्या  कामाच्या  ठिकाणी  पोहचण्याचा  केविलवाणा  प्रयत्न  करतोय  इतक्यात  एक  अॅक्टीवा स्कुटर वर  दोन  शिडशिडीत  चणीच्या दोन ललना (बहुधा पुण्याच्या नसाव्यात) बाजूला  येऊन थांबत मला विचारतात...

एक्स क्युज मी  ABC ला कसे  जायचे?
मी.. (क्षणभर गोंधळात..  डोक्यात विचार .. हा कुठला नवा  भाग... मेंदूत चाचपणी ????)
त्या...उत्तराची  वाट  बघतायेत..
मी... सावरून  वाटेला  लावायचे  काम  करतो..
तितक्यात  सिग्नल  सुटतो  आणि माझ्या  डोक्यात  भुंगा...
लहानपण  पुण्यात गेल्यामुळे  असेल  कदाचित  पण ही  अशी  नावे कधी विचारच  केली  नव्हती.अप्पा बळवंत चौकाचे  ABC हे नाव  बहुधा परप्रांतीयांनी दिलेले  असावे. पण नाही  म्हणता ही फॅशन रूढ होत आहे. प्रत्येक नाव  ठेवायच्या  मागे  काहीतरी  इतिहास किंवा त्या  त्या व्यक्तिला दिलेला सन्मान असतो. पण  तिच्या  तोंडून बाहेर  आलेले  इंग्रजाळलेले शब्द  ऐकून  कीव आली. शाॅट॔कट हा  या  पिढीला  लागलेला  रोग  म्हणावा का  इतपत  विचार  डोकावून गेला. पुर्वी  मोबाईल  हा  प्रकार  नसल्यामुळे पत्रात  पूर्ण  वाक्य  लिहावी  लागायची  वीस  पैशात  मनातले  सगळे  त्या  सरकारी  छापील  कागदावर  लिहून झाल्यावर  बरे  वाटायचे तेव्हा  जर  हे  असले  फाजील  शाॅट॔कट  असते  तर वाचणारा घेरी  येऊनच  पडला असता. अर्थात  एकदा  पत्रातला  हा  शहाणपणा  मी  वाचलाय.
लआमोनविवि .... खेळ खल्लास.. खूप विचाअंती कोडे उलघडले ते असे... लहानांना आशिर्वाद  मोठ्यांना नमस्कार विनंती विशेष..
पण मजकूर लिहायला जागा कमी असते ह्या  एका विचाराने माफ  केले. पण  इथे  बोलताना  पण  शाॅट॔कट  म्हणजे जरा अतीच झाले. मोबाईल  वरील  शाॅट॔कट  लिहीणे  म्हणजे  कहर  आहे. गेले एक  तप  मोबाईल  वापरतोय  पण  ह्या  असल्या  जगड़व्याळ गोष्टी  अजूनही  समजण्याचा  पलिकडल्या  आहेत. तशीही  पुण्यातील  ठिकाणाची  नावे  खुमासदार त्यात हे  असले बोलणे म्हणजे बालपण पुण्यात गेलेले  आजोबा हे असलं ऐकून फेफरं  येऊन पडतील. केपी (कोरेगाव  पार्क ) पण त्यातलाच  प्रकार.  थोडक्यात  काय तर  येणाऱ्या काळात या  असल्या गोष्टी  कानी  पडणार... होता होइल ते आपणच  शहाणे  व्हावे  अन्यथा  समोरची व्यक्ती आपल्याला  येडछाप ह्या कॅटेगरीत अलगद नेऊन कधी ऊभी करेल ह्याचा नेम नाही.