Wednesday, May 28, 2014

मेहनतीचे फळ


गेले चारेक वर्ष झाली असतील मी माझ्या स्वप्नाचा पिच्छा पुरवतोय. निरनिराळ्या आघाड्या वर मी निरंतर मनात स्वप्न पाहत होतो.कधी कुठे शिबिराला जा. आवाजावर तयारी कर.असे एक ना अनेक प्रकार आणि प्रयोग चालूच आहेत. एक दोन ठिकाणी नकार हि पचवावा लागला. वेळ देऊन तयारी करून पण काहीच उपयोग झाला नाही आणि मी त्या कंपू मधून बाहेर फेकला गेलो. इतरही अनेक किस्से झाले पण त्यात मी अडकून पडायचे नाही असे ठरवले होते.वेगवेगळ्या लोकांच्या ओळखी हि तर ह्या माध्यमाची ताकद आहे हे मी पूर्वी पासून ओळखून होतो पण इथे आल्यावर खरी कसोटी लागली आणि हे क्षेत्र कसे आहे ह्याचे अंदाज यायला लागले.चुकातून  शिकणे  हा माणसाचा स्थायीभाव आहेच पण कधी कधी निराशेचे ढग हि तेवढेच  दाट असतात आणि मग त्यातून तावून सुलाखून बाहेर पडणे हि जमायला हवे. मी खरेतर खूपच चौकस आणि अभ्यासू वृत्ती ने ह्या क्षेत्राकडे बघत आलोय माझ्या कामाच्या ठिकाणी मी ह्या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांना जवळून बघितले आहेच पण त्यातील बरीचशी आता मला ओळखतात सुद्धा. खूप काही शिकायचे आहे ही वृत्ती अंगी बाळगली कि आपले मार्ग हि कसे छान खुले होतात आणि आपल्याला मार्गक्रमणा  करणे पण सोप्पे जाते. एवढे सगळे सांगायचा मुद्दा हा कि, कालच माझ्या एका छोटी भूमिका असलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग रंगला. इतके दिवस धावपळ,वेळेचे गणित, घरातल्यांचा राग-लोभ ह्या सर्वावर काल मात झाली आणि  मला त्याचे फळ मिळाले 
गेले सव्वा महिना आम्ही आमच्या नाटकाची तयारी करत होतो. रोज काही ना काही  नवीन शिकत आम्ही आमच्या नाटकाच्या तालमी चालू ठेवल्या होत्या.विषय तसा गंभीर होता पण आमच्या टीम ने एक सुंदर असा प्रयोग काल सादर केला आणि मी इतके दिवस बघत आलेलो स्वप्न हि पूर्ण झाले. "आरंभ" हे नाटकाचे शीर्षक हि किती चपखल. खरोखरच माझ्या आणि इतरही काहींच्या कारकिर्दी करिता आरंभ झाला म्हणायचा... पडद्यामागील भूमिका पण मला काल समजावून घेता आली आणि अंगावर पडलेला लाईट चा स्त्रोत हि अंगावर शहारे आणनारा  ठरला. सुरवात खूपच चांगली झाली. एका उत्कृष्ठ टीम चे दर्शन काल झाले आणि नकळत वाटून गेले कि अरेच्चा.. आपण सारे इतके  एकवटलो  आहोत कि हाच काय ह्याच्या पुढचा प्रत्येक प्रयोग सुंदर होणार आहे.. खरच एका मस्त प्रवासाला काल सुरवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. सर्व आप्त स्वकीयांच्या शुभेच्छा च्या बळावर हि नौका नक्कीच एक चांगला किनारा गाठेल ह्यात शंकाच नाही. 
अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. हि तर कुठे सुरवात आहे असे म्हणा हवे तर.. बघुयात भविष्यात हि नौका कुठे आणि कुठल्या किनाऱ्यावर लागते ते.