Saturday, October 15, 2011

आली दिवाळी...


लहानपणा पासून सर्वाना दिवाळी ह्या सणाचे फार मोठे कौतुक असते. कधी हा सण येतो आणि मजा करायला मिळते असे ह्या सणाच्या निमित्ताने होऊन जाते. साधारण वीसेक वर्षापूर्वी पुण्यात वाडे संस्कृती असल्यामुळे ह्या सणाची मजा सर्वजण एकत्र येऊन घेत असत. परीक्षा संपल्या कि सर्व बच्चे कंपनी ला किल्ले करायचे वेध लागायचे.आम्ही सर्व लहान मुले माती कुठे मिळते ह्याचा शोध घेत फिरायचो आणि ती चाळून आणणे हा मोठा उद्योग असायचा.हे सर्व करण्या मध्ये वेळ कसा मजेत निघून जायचा.गल्ली मध्ये फिरताना घरा घरा मधून येणारे फराळाच्या पदार्थाचे सुगंध तर वेड लावत असत. कधी एकदा हा सण येतो असे होऊन जायचे. आम्हा मुला मध्ये तर कोणाचा किल्ला भारी ह्या गोष्टीवरून पैज लागायची आणि सर्व जण एकमेकांच्या घरी जाऊन किल्ले बघत असू. मित्रांच्या आया आम्हाला फराळाला आवर्जून बोलवत असत आणि आम्ही देखील मजेत त्यांच्या कडे जाऊन फराळावर आडवा हात मारत असू. दिवाळीच्या पहिल्यादिवशी तर धमाल असायची अभ्यंगस्नान करायच्या आधी गल्लीत जाऊन एखादा चुकार मुलगा मोठा आटोम बॉम्ब लावायचा आणि सर्व गल्ली कशी जागी होईल हेच पहायचा. ओट्यावर झोपलेल्या लोकाजवळ तर हटकून हे असले प्रकार व्हायचे आणि सकाळी सकाळी बोंबाबोंब सुरु व्हायची मग आम्हाला सकाळी उजाडल्यावर विषय मिळत असे. फटके फोडण्यावरून तर किती वाद व्हायचे ह्याला काय सुमार नसायचा. जागा मिळेल तिकडे फटाके फोडले जायचे आणि लोक बोंब मारत घराबाहेर यायचे.नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन,पाडवा हे सर्व सण दणक्यात साजरे व्हायचे. आकाश कंदील घरी बनवणे ह्या सारखा आनंद नाही आणि आम्ही तो मनसोक्त उपभोगला आहे.
काल परवा मी मार्केट मध्ये खरेदी करायला गेलो होतो म्हटले दिवाळीची खरेदी करावी तर सर्व संदर्भ बदलल्या सारखे वाटले खूप सपकपणा जाणवला लोकांचा उत्साह होता पण त्यात कुठेतरी सर्व जण आपल्या परीने लहान पणी दिवाळी कशी साजरी करायचो आणि आता किती तरी बदल त्यात आला आहे हाच विचार करत खरेदी करत आहे असे वाटत होता. लहान मुलांचे किल्ले हे आता रेडीमेड मिळतात हे बघून तर हसावे कि रडावे हेच कळेना. आणि मंडळी ते पण मजेत खरेदी करत होती असो.
दिवाळी सणात दिव्यांची आणि पणत्यांची जी काही खुमारी असते ती लाजवाब म्हणयला हवी.

Friday, June 3, 2011

निसर्गपान....!!!!!!

फिरण्याची आवड कोणाला नसते जो तो आपल्या परीने आजूबाजूचा परिसर धुंडाळत असतोच कि. माझे हि तसेच काहीसे झाले हि गोष्ट आहे आठेक वर्ष पूर्वीची मी काम करत असलेल्या समूहा मार्फत आम्हला भारत भर फिरण्याची जणू संधी मिळाली आणि तिचा पुरेपूर फायदा घेत आम्ही आमचे अनुभवाचे विश्व संपन्न केले आणि खूप दिवसापासून ची माझी जी इच्छा होती कि, एखादा लांबचा प्रवास करायला मिळावा आणि तो हि पूर्ण पणे साहसी असावा... ती संधी चालून आली २००३ च्या ऑक्टोबर महिन्यात त्याला कारण हि तसेच होते पुणे ते सिक्कीम असा रोमांच कारक प्रवास आम्हा पाच जणांना क्वालीस या वाहनातून करायचा होता. नकाशा बघण्यापासून मार्गामध्ये येणाऱ्या निरनिराळ्या अडथळ्यांचा  अभ्यास केल्यावर असे लक्षात आले कि हा संपूर्ण प्रवास ५-६ राज्यामधून होणार आहे. निघायच्या दिवसापर्यंत सर्व जामानिमा जमवत आम्ही एकदाचे मार्गस्थ झालो. गाडी मध्ये ५ लोक होतो त्यात मी,राजा (ड्रायवर),पिंट्या,मोहन (कुक)चिन्या(वाटाड्या) अशी विभागणी झाली.टप्प्या टप्प्यात हा प्रवास करायचा असा दंडक आम्हला घालून दिला होता पण राजा ने दिवसभर गाडी चालवायची आणि रात्री मी बसायचे असे ठरले नगर, अमरावती, नागपूर, भंडारा,राजनांदगाव,रायपुर,दुर्ग,भिलाई,संबलपुर असे करत आम्ही केओन्झार कधी मागे टाकले ते कळले नाही. दुसरा दिवस उजाडून दुपार झाली आणि दिवस मावळतीला लागला तेव्हा सर्व जण निद्रा देवीची आराधना करू लागले.देवगड नावाच्या छोट्या गावात एक चांगलासा लॉज बघून आम्ही तिथे झोपायचा निर्णय घेतला. सकाळी उठल्यावर परत आमचा प्रवास सुरु झाला. अतिशय सुंदर घाट रस्त्यावरून आम्ही आमची मार्गक्रमणा करत होतो पण रस्ता अतिशय खराब आणि खड्डया नि भरलेला होता.मनात एक काळजी होती , जर का गाडी कुठे पंक्चर झाली तर काही खैर नव्हती. हा सर्व परिसर ओरिसा ह्या राज्याचा होता दुपारी आम्ही झारखंड सोडून परत ओरिसा मध्ये प्रवेश करते झालो. रस्त्यामध्ये जाताना ह्या राज्यात असलेले मागासलेपण लक्ष वेधून घेत होते आणि मनोमन आपण खूप सुखी असल्याचा अभिमान वाटत होता. संध्याकाळी आम्ही खरगपूर सोडून मिदनीपूर मार्गे कोलकाता ह्या पश्चिम बंगालच्या राजधानी मध्ये प्रवेश केला. हुगळी नदीवरील भलामोठा हावडा ब्रिज मावळतीच्या सुर्यकिरणानी  न्हाऊन निघाला होता आणि क्षितिजावर अंधार आणि उजेडाचा खेळ चालू असताना ब्रिज वरील मिणमिणते दिवे सुंदर दिसत होते.जवळ प्रसिद्ध असे इडन गार्डन हे क्रिकेटचे मैदान देखील दिमाखात उभे होते. आम्ही तसेच पुढे जाऊन विमानतळा जवळील एका हॉटेल मध्ये पेटपूजा करून पुढील प्रवासाकरिता मार्गस्थ झालो. रात्रीचा प्रहर आणि अनोळखी प्रदेशामधून प्रवास करताना एका अनामिक भीतीचे सावट जसे असते तसे आपले शेवटचे स्थान गाठण्याकरिता चाललेला प्रवास हि तेवढाच मजेशीर असतो. मध्यरात्री कधीतरी किशनगंज सोडल्यावर पहाटे आम्ही "फराक्का" नावाच्या एका छोट्या गावातून जात होतो. बंगाल च्या सागराला मिळालेले एक पाण्याचे टोक आणि त्यावर बांधलेला २-३ किमी चा लांबलचक ब्रिज पाहून नतमस्तक झालो आणि भीतीने पोटात उठलेला गोळा हि अनुभवला. सकाळी कधी तरी मालदा ह्या शहरातून बाहेर पडून सुसाट वेगाने आम्ही आमच्या शेवटच्या टप्प्या कडे जात होतो आणि बरोबर सकाळी ११ वाजता आम्ही "सिलीगुडी" ह्या शहरामध्ये पोहोचलो.अडीच दिवस अव्याहत पणे आमची गाडी चालू होती आणि मुक्काम न करता आम्ही इथे पोहचलो होतो.दमलो असल्याने आम्ही झोपून संध्याकाळी बाहेर पडलो. काही जुजबी खरेदी करून आम्ही सकाळी परत पुढील प्रवासाकरिता रवाना झालो. सिलीगुडी-सिवोक-आडवा नाला-मेल्लीबाझार-तिस्ता-आणि पश्चिम बंगाल आणि सिक्कीम च्या वेशीवर असलेल्या "रांगपो" ह्या गावात पोहोचलो.गावाच्या अलीकडेच असलेल्या एका ठिकाणी आमचा कॅम्प असणार होता. बाजूला तिस्ता नदीचा साथ,खळाळत आणि अव्याहत वाहणारे ते पांढरे शुभ्र पाणी बघून मनाचा थकवा पार पळून गेला. अतिशय शांत आणि सुंदर निसर्ग लाभलेला हा परिसर मानसिक आनंद देऊन गेला.  टाटा  मोटर्स  ह्या  कंपनी  करिता  आम्ही  सलग  चार  समूह बंधनाचे  प्रोग्राम  करणार  होतो. भारताचे  ईशान्य  टोक  जवळ  असल्याने  सकाळ  लवकर  व्हायची  आणि  दिवस  पाच  ला मावळायचा. रात्री  तंबूत  लावलेले  कंदील हेच  आमचे  जवळचे  वाटायचे. तीस्ता नदीचा  अखंड  खळाळता  प्रवाह साथीला  असायचा. जंगल  कॅम्प  असल्याने  आम्हाला  रात्री  सजग  रहावे  लागायचे. इथल्या  लोकांचे  वैशिष्टय़  म्हणजे  चिवट  शरीर  यष्टी  आणि  कामाला असलेली  तत्परता. बहुसंख्य  महीला ह्या  घरातील  आर्थिक  जबाबदारी  उचलताना दिसतात  क्वचितच  पुरूष  काम करताना आढळतात. दिवसभर  दारू  ढोसण्यात ही  मंडळी  धन्यता  मानतात. निसर्गाची  मुक्त  हस्ते  होणारी  ऊधळण ह्या  राज्यात  बघायला  मिळते. तद्वत डोंगराळ  भाग  असल्याने कष्टप्रद  जीवन  इथल्या  नागरिकांच्या अंगवळणी  पडले आहे.
विखुरलेली  आणि  तितकीच  सुबक  घरे  बघून  गंमत  वाटते. चपट्या  नाकाची  शेंबडी  पोरं  सुखनैव  बागडताना  दिसतात. डोंगरात  असलेल्या  शाळा  बघून  आपल्या  कडील  विद्यार्थ्याची  मनात नकळत  तुलना  होते. निसर्ग  हाच  खरा  गुरू  हे  तिथे  गेल्या शिवाय  कसे  कळणार....

निसर्गाच्या कुशीत काढलेले ते २३ दिवस माझ्या आयुष्यातील एक सुंदर निसर्गपान म्हणून मी जपून ठेवले आहे. सुंदर आणि अनुभवाने खचाखच भरलेले ते दिवस विसरू म्हणता विसरता येत नाहीत आणि जेव्हा केव्हा मनात विचारांची गर्दी दाटून येते आणि निराशेचे ढग जमू लागतात तेव्हा मी हा प्रवास आठवून माझी पुढची मार्गक्रमणा करतो.

Saturday, May 21, 2011

bhindast karo jo man kahe...

नवीन काहीतरी करायचे असे प्रत्येकाला वाटत असते आणि जो तो आपल्या परीने त्या दृष्टीने प्रयत्न हि करत असतो. मी हि आजकाल ह्याच वेडाने झपाटलो आहे आणि काहीतरी नवीन शोधात निघालो आहे. मला माहित नाही कि मी निवडलेला मार्ग किती सुरक्षित आहे आणि किती मेहनतीचा आहे पण मी ह्या मार्गावर जाण्याकरिता स्वताला तयार केले आहे.मनुष्य स्वभाव म्हणा हव तर पण ह्या अशा वागण्याचा प्रत्येक जण अनुभव घेत असतो आणि आयुष्यात नवीन काहीतरी करायचा ध्यास घेऊन पुढे जात असतो. काही लोक असतात कि जे करत असलेल्या गोष्टीवर समाधानी नसतात आणि दूषण देऊन जे काही करायचे आहे ते हि ती मंडळी करत नाहीत.माझ्या बाबतीत म्हणाल तर आज पर्यंत मी माझ्या आतला आवाजच ऐकत आलोय. कोणी काहीही म्हणो मला जे पटेल रुचेल तेच मी करत आलो आहे.ह्या प्रवासात खूप काही डागण्या देणाऱ्या घटना घडल्या पण त्या तिथेच सोडून मी माझी मार्गक्रमणा चालू ठेवली आहे काही नवीन करायचे म्हटले कि पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे 'लोक काय म्हणतील' ह्याचा आणि जे काही करायची उर्मी मनात आली असेल ती ह्या विचाराने पुरती गळून पडते आणि पुढे आलेल्या संधीचे आपण स्वागत करू शकत नाही. कारण समाजमनाचा घट्ट पगडा आपल्यावर असतो.पण हे सर्व झुगारून जो आपली मार्गक्रमणा करतो त्याला नक्कीच इप्सित साध्य होते आणि त्याचे आयुष्य जगण्याचे सुख त्याला मिळते.

कारण घडणारी प्रत्येक गोष्ट,घटना हि आपल्याच आयुष्यात घडते आहे हा सगळीकडे पसरलेला समज (?) त्याला कारणीभूत असतो पण काहीही असो जर आपल्याला वाटले कि काही करावे तर नक्की करा. हटके असेल तर उत्तमच आणि नसेल तरी उत्तम..... म्हणतात ना.. सब अच्छा हुआ तो अच्छा है नही हुआ तो और भी अच्छा है...