Monday, October 19, 2020

मी ..विचार आणि फुले...

 पावसाळ्या नंतर महाराष्ट्रातल्या डोंगरावर जणू फुलाची आरास फुलते आणि मग सुरु होतो रंगाचा खेळ. निसर्ग मुक्त हस्ते आपल्या दोन्ही हाताने हिरवाई वर जणू  फुलांचा बगीचा फुलवतो त्याला मग नसते कसले बंधन कि आडकाठी आपण फक्त आणि फक्त त्याचा आस्वाद घ्यायचा आणि मनोमन धुंद फुंद होऊन जायचे. खूप दिवसापासून माझा कॅमेरा अडगळीतून मी बाहेर काढला आणि चालू पडलो ह्या निसर्गाच्या नवलाईचा सोहळा बघायला नवरात्री चा आरंभ ते दिवाळी पर्यंत हा सोहळा आपण अनुभवू शकतो ह्याला कोठेही जंगलात जायची गरज लागत नाही कि कुठेही शहरापासून लांब .....



मी मनोमन कॉसमॉस फुलाचे फोटो काढूयात हि इच्छा ठेऊन बाहेर पडलो तशी डोंगर हा पुणेकरांसाठी काही नवीन नाही पुणे शहर हेच डोंगराच्या कुशीत वसले असले कारणाने चहूबाजूला कुठेही जाऊन आपण त्याचा स्वाद घेऊ शकतो. ठरल्या वेळेनुसार मी तळजाई च्या पठारावर पोचता झालो कॅमेरा गळ्यात लटकावून सगळी आयुध मी  सरसावून फोटोग्राफी ला सुरवात केली पण मनासारखा लाईट काही मिळत नव्हता नुकताच शहराला माघारी फिरणाऱ्या मान्सून चा फटका बसला असलेने ढगांची तुरळक उपस्थिती होतीच त्यामुळे सकाळची कोवळी किरण काही अजून जमिनीवर पडली नव्हती.एव्हाना माझ्यातला फोटोग्राफर जागृत झाला होता. रोज फिरायला जायची सवय असल्या कारणाने मी तशी तंग पॅन्ट अर्थात बर्मुडा घालून बाहेर पडलो होतो. जामानिमा सगळा असला तरीही सह्याद्री मध्ये काळानुसार आणि ऋतूनुसार कीटकांची उपस्तीथी असते ह्याचे भान विसरायला झाले होते. मी मुख्य रस्त्यावर थोडासा आत जायचा प्रयत्न करत होतो जेणेकरून मला शांततेने माझ्या फोटोग्राफीचा आनंद लूटता यावा. एव्हाना रस्त्यावर हौसे  नवसे गवसे असे सगळी मंडळी व्यायाम कमी पण गप्पाष्टकामधे रमत मार्गक्रमणा करत होती. माझे लक्ष हे फक्त फुल आणि कोवळी उन्हे ह्याचा शोध घेत होती आणि अखेर ती वेळ आली सूर्यकांत तळपदे अर्थात सूर्यनारायणाने दर्शन दिले आणि मी सरसावून माझ्या छंदाला क्लिक क्लिकाटाची जोड देत अजून काही चांगले फोटो येतात का हे पहात होतो अजून अजून करत मी तसा चांगलाच आत आलो होतो सुरवातीला असणारा माझा उत्साह आता मावळतीकडे निघाला होता त्याला कारण हि तसेच होते. माझ्या पायाला गवतांमधील कीटक चावायला सुरवात झाली होती आणि चांगलेच लाल लाल झाले होते. हे सगळं करत असताना मला आताशा जाणीव व्हायला लागली होती कि माझा हात थरथर कापतोय आणि इतक्या वर्षाची माझी थोर तपस्या माझ्या आळसाने धुळीस मिळवली आहे. कारण फोटोग्राफी हा छंद फक्त आणि फक्त तुमच्या कौशल्यावर आधारित आहे एकदा का कॅमेराचा आणि तुमचा संबंध सुटला कि तुमचा हात थरथरला... तेच माझेही व्हायला लागले होते. मी अजून काही मनातले जे फोटो हवे  तसे काढायचा प्रयत्न केला पण मना जोगते फोटो मी काही काढू शकलो नाही आणि झरझर पावले टाकत मी मुख्य रस्त्याला आलो जेणेकरून मी कीटक पासून सुटका करून घेऊ शकेन. अर्थातच माझा फोटोग्राफीचा  बेत पूर्णत्वास गेला नाहीच. मी हिरमुसल्या मनाने बाहेर पडलो ते पुढच्या वेळेस नक्कीच चांगले फोटो काढीन ह्या इराद्याने...