Thursday, May 23, 2013

मित्रानो, लाकूडतोड्याची गोष्ट आपण सर्वांनी लहानपणी वाचली आणि ऐकली असेल पण मला सुचल्या प्रमाणे मी हि लाकूडतोड्याची गोष्ट माझ्या शब्दात मांडायचा प्रयत्न केलाय. मला आशा आहे कि तुम्हाला हि सर्वाना माझी गोष्ट आवडेल फक्त एक करा या गोष्टीला नाव सुचवा आणि गोष्टीचे तात्पर्य काय असू शकते हे सांगायला आपल्या कॉमेंट मध्ये विसरू नका.

एका नगरात कोंडीबा नावाचा लाकुडतोड्या आपल्या कुटुंबीया समवेत राहत होता. रोज जंगलात जाऊन लाकूड फाटा तोडून आणणे आणि तो नगरच्या बाजारात जाऊन विकणे असा त्याचा दिनक्रम. विमला हि त्याची बायको तोज त्याला शिदोरी बांधून देत असे. गणेश आणि विनेश हि त्याची दोन मुलेही त्याला लाकूड फाटा आणन्या च्या कामात मदत करत असत. कोंडीबा चा मित्र सखाराम हा देखील अधून मधून त्याच्या कडे येत जात असे जो गावातला एक बलुतेदार होता. कोंडीबाचे आपल्या कुटुंबावर निरतिशय प्रेम होते. अतिशय प्रामाणिक  असा हा लाकुडतोड्या संपूर्ण नगरात सर्व जनतेला माहित होता. कारण त्याच्या लाकूड फाट्या शिवाय लोकांच्या चुली पेटत नसत आणि आंघोळीला गरम पाणीही मिळत नसे. कुणाचेही देणी नसलेला असा हा कोंडीबा आपले आयुष्य आणि दिवस नित्य क्रमाने जगत होता. एकेदिवशी विमला कडून त्याने शिदोरी बांधून घेतली आणि  लाकूड फाटा  आणण्या करिता हा जवळच असलेल्या ''पाचनयी'' च्या जंगलात गेला. अतिशय रम्य असे हे जंगल जवळच असलेला सुंदर तलाव आणि घनदाट झाडी करिता सुप्रसिद्ध होते. आजचा दिवस पण कोंडीबा करिता रोजच्या सारखाच होता. एक मोठे झाड बघून त्याने लाकूड तोडायला सुरवात केली. त्याची आवडती कुऱ्हाड सपासप लाकूड कापत असताना त्याचे लक्ष विचलित होऊन त्याच कुर्हाडीचा घाव पायाच्या बोटावर बसला कोंडीबा कळवळला आणि इतक्यात त्याची आवडती कुऱ्हाड त्या पाण्यात पडली. काय करावे ते कोंडीबा ला सुचेनासे झाले. अत्यंत उद्विग्न आणि दुखी होऊन तो मटकन खालीच बसला त्याला पुढे काय होणार ह्या विचाराने रडू कोसळले. कारण त्याची आवडती कुऱ्हाड पाण्यात पडली होती. देवावर विश्वास असलेला कोंडीबा आपल्या नशिबाला दोष देत तिथून निघून जायला निघाला इतक्यात त्याला मागून आवाज आला.
कोंडीबा ssss कोंडीबा ssss
कोंडीबा- कोण --- कोण--
जलदेवी- मी जलदेवी...
कोंडीबा- आ ... तू आणि ह्या जंगलात
जलदेवी- होय कोंडीबा, तुझे कष्ट आणि मेहनत मी जाणते काय झालंय तुला दुखी व्हायला?
कोंडीबा- माझी आवडती कुऱ्हाड ह्या पाण्यात पडली आहे आणि मी लाकूड फाटा नाही नेला आणि तो नगरातल्या बाजारात नाही विकला तर खाऊ काय? बायको आणि मुलांना सांगू काय?
जलदेवी- थांब कोंडीबा. मी आणते तुझी कुऱ्हाड.
असे म्हणून जलदेवी पाण्यात जाऊन एक चकाकणारी सोन्याची कुऱ्हाड घेऊन आली. जलदेवी ने कोंडीबा ला विचारले.
"हीच का तुझी कुऱ्हाड"
कोंडीबा ने " नाही" असे उत्तर दिले.
अशीच तीन डुबक्या मारून जलदेवी ने त्याला अनुक्रमे चांदी, आणि हिर्याची पण कुऱ्हाड दाखवली पण कोंडीबा चे उत्तर "नाही" असेच होते. पण जेव्हा जलदेवी ने त्याची आवडती कुऱ्हाड दाखवली तेव्हा कोंडीबा खुशीने नाचायला लागला आणि हीच ती माझी आवडती कुऱ्हाड म्हणाला. जलदेवी त्याच्या प्रामाणिक पणावर खुश होऊन म्हणाली " कोंडीबा... आजकालच्या जगात इतका प्रामाणिक पणा दुर्मिळ झालाय मी तुझ्यावर प्रसन्न आहे". जल देवीने सोन्याची, चांदीची आणि हिर्याची कुऱ्हाड पण कोन्दिबाला देऊ केली. अतिशय खुश होऊन कोंडीबा घराकडे निघाला. घरी आल्यावर त्याने घडलेली हकीकत विमला ला सांगितली. दोघांनी पूर्ण विचारा अंती नगर सोडण्याचा निर्णय घेतला आणि तालुक्याच्या ठिकाणी जाऊन राहायचे ठरवले. त्यांनी सखारामला हि बरोबर घ्यायचे ठरवले. तालुक्याच्या ठिकाणी कोंडीबाने  त्या कुर्हाडी विकून मोठी वखार विकत घेतली आणि कोंडीबा चा कोंडीबाशेट म्हणून तालुक्याला तो सुप्रसिध्द व्यापारी झाला. सखाराम त्याच्या कडेच व्यवस्थापक म्हणून कामं करू लागला. आणि सर्वजण आपले पुढील आयुष्य सुखाने जगू लागले.

No comments:

Post a Comment