Saturday, August 16, 2014

१५ ऑगस्ट १४: एक विचार


१५ ऑगस्ट म्हटले कि दरवेळी गाणी आणि चौका चौका मध्ये चाललेला गोंधळ हे असेच चित्र काही वर्षापूर्वी पर्यंत सगळीकडे दिसायचे. जवान बद्दल आपुलकी आणि प्रेम व्यक्त करायचा हा दिवस. ज्यांनी आपल्या छाती वर गोळ्या झेलून आज आम्हाला सुरक्षित ठेवले त्यांना वंदण्याचा हा दिवस... पण आपल्यातले किती जण त्या जवाना मध्ये जाऊन हा दिवस साजरा करतात कोणास ठाऊक. इतकी वर्ष मी हि ह्या गोंधळाचा भाग होतो पण आज  मला आपल्या जवाना बद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली आणि नुसती संधी नाही मिळाली तर त्यांना प्रेमाने जेवू  घालायचा पण योग आला.
wolfpack  आणि bikarni  ह्या दोन  मोटार सायकल ग्रुप ने मिळून हा सुंदर कार्यक्रम घडवून आणला आणि आजच्या स्वातंत्र्य दिनाचे चीज झाले. दिवस उजाडला जणू एक उल्हसित सकाळ. पटापट आवरून बाहेर पडलो आणि तडक खडकीचे 'अपंग पुनर्वसन केंद्र' गाठले आमच्या आधी काही बाय कर मंडळी उपस्थित होतीच. हळू हळू व्हील चेअर वरील जवान मैदानात जमू लागले. ध्वजरोहणा नंतर त्या सर्व जवानांनी तिथे असलेल्या स्पर्धा मध्ये भाग घेऊन चांगला आदर्श निर्माण केला.  माझ्या डोक्यात विचाराचे चक्र फिरायला सुरवात झाली होती. हाती पायी धड असलेल्या लोकांना पण जमणार नाही असे काही खेळ आणि करामती हि मंडळी करत होती आणि त्यांच्या बरोबर नियतीने केलेल्या क्रूर खेळाचा दुखाचा लवलेश हि त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. काय म्हणावे ह्या दुर्दम्य आशावादाला ? किती चटकन आपण एखादे काम जमणार नाही म्हणून सरळ हात झटकतो पण इथे तर ती मुभा नियती ने त्यांना दिलीच नाहीये. त्यांच्या ह्या परिस्थिती कडे बघून धड धाकट लोक जेव्हा एखादी गोष्ट करायला बिचकतात त्याची कीव येत होती.   कितीतरी वेळा आपण सर्व जण काही न काही कारणाने आयुष्यात करायचा गोष्टी मागे ठेवत जातो. त्याला कारणे कुठलीही असोत पण खूप काही करायचे राहून गेले हि भावना कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात असतेच असते. पण मग मनात आलेली कुठलीही गोष्ट करायला आपल्याला कोण आडवते ? शरीराचे सर्व अवयव धड धाकट असताना देखील आपण धजावत नाही... आणि आज इथे तर एका दुर्दम्य गोष्टीचे दर्शन घडत होते. कोणी खेळाडू म्हणून नाव गाजवत आहेत तर कोणाला कब्बडी चे सामने पहायचे आहेत. शरीर नुसती व्हील चेअर वर बसून आहेत पण मनात असलेला आशावाद काय वर्णावा...


आजचा स्वातंत्र्य दिवस खूप काही शिकवून जाणारा ठरला. इतकी वर्ष नुसतेच एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आलो होतो पण तिथे गेल्यावर जगण्याचा खरा अर्थ समजला. दुर्दम्य इच्छाशक्ती,आशावाद, दुखात असून हसणे काय असते याची प्रचीती आली.

1 comment: