Wednesday, March 26, 2014

दोन पाखरांचा संसार...

गेले दिडेक वर्ष तरी माझ्या घराच्या बाहेर चिमण्या करिता मी एक घरटे लावून ठेवले होते. त्यांना खाद्य देणे, पाणी ठेवणे हि कामे पण इमाने इतबारे चालूच होती. पण चिमण्या काही केल्या त्या घरट्या मध्ये जात नव्हत्या आणि माझी घोर निराशा होत होती. खरतर, एखाद्या माणसाला कुठले हि घर दिले तर तो लवकर बाहेर पडायचे नाव घेत नाही. जुने भाडेकरू आणि मालक ह्यांच्या मधला वाद तर मी लहान पणापासून बघत आलो आहे. आपल्या चाळीतील भाडेकरूला बाहेर कसा काढायचा आणि आपल्या जागेवर कब्जा कसा मिळवायचा अशा विवंचनेत घर मालक असा हा आज कालचा काळ आणि इथे मी चिमण्या करिता फुकट घराची सोय केली आहे आणि त्या त्यात जात का नाहीत ह्याचे कोडे काही केल्या मला उलघडत नव्हते.असे मी काय चुकीचे घरटे त्यांना बांधून ठेवले आहे कि त्यांनी त्याकडे पाठ फिरवावी. माझ्या मनातला खल काही केल्या मला स्वस्थ बसू देत नव्हता. चिमण्या गायब झाल्या आहेत ह्याची ओरड तर आपण सर्व जण ऐकत आहोतच, पण मग इथे ह्या दिसतात आणि घरट्या कडे का जात नाहीत ?  ह्या गोष्टीमुळे खूप नवल वाटत होते.

त्यांचे घरटे ज्या लाकडी बॉक्स पासून तयार केले आहे ती तर कल्पना अफलातून होती, तरी पण ह्या त्यात का जात नाहीयेत? अखेर काल अर्णव ने ह्याला वाचा फोडली. मी जो लम्बुलका बॉक्स तयार केला होता तो जरा अमळ खोल होता. चिमणी आत जाऊन बाहेर कशी येणार ह्याची कुठलीच सोय त्यात नव्हती. शेवटी मला इतके वर्ष पडलेले कोडे ह्या चिमुरड्याने क्षणार्धात सोडवले होते. तो बॉक्स आडवा केल्यावर चिमण्यांनी त्यांचा संसार मांडायला लगेच सुरवात केली. म्हणजे इतके दिवस मोकळा पडलेला एक सुंदर फ्ल्याट त्यांना आवडला होता. आता पावसाळ्याच्या अगोदर त्या मध्ये एखादा चिमुकला पाहुणा देखील येईल. अर्थातच आमच्या तिघांच्या हि चेहऱ्यावर हसू फुलले. एका मोकळ्या पडलेल्या घरट्याला आता उब मिळाली आहे. 

No comments:

Post a Comment