Sunday, August 7, 2016

नेमेचि येतो तांडा

आज सकाळी सकाळी  अचानक  मला  मेंढय़ाच्या  आवाजाने  जाग  आली. आम्ही  तिघे  खिडकीतून  डोकावून  बघतो  तर  काय   दोनकशे मेंढय़ा बॅ बॅ आवाज  करत  घरा  मागे  जमा  झालेल्या  कुठेतरी  पश्चिमात्य देशात  असल्याचा भास होत होता. पावसामुळे  सगळा  आसमंत कसा हिरवगार  झालेला त्यात  ह्या  किरमिजी  रंगाच्या  मेंढय़ा विशेष ऊठून दिसत  होत्या. दरवर्षी पावसाळ्यात  घरामागील  मोकळ्या  मैदानात  हा  पाल येत असतो. कधीकधी  पावसाची  झड लागून राहते मग  सुरू  होतो माझ्या मनात  विचारांचा  कालवा..
दोनेक  पुरूष  माणसे, बायका, चिल्ली पिल्ली, मेंढ्या आणि  सोबतीला  दोनेक घोडे असा  हा  सगळा जामानिमा स्थानापन्न होतो. टारपोलिन टाकून तात्पुरती  बनवलेली उघडीवाघडी झोपडी.  त्या जागेत कुठलीही ऐहिक  सुखे  नसताना ही मंडळी सुखेनैव राहतात. नळ सोडला की पाणी  हजर... सकाळी सकाळी  शौचालय  कुठे आहे  हा  प्रश्न बहुतेक त्यांना  पडत नसावा. खुल्या आभाळा खालीच आंघोळ  उरकली जाते  आणि मग  ह्या सर्व मेंढय़ाना घेऊन  चरावयास जाण्याची तयारी सुरू होते. चुलीवरचं आधण ढाणढाण पेटलेलं असतं आजुबाजुला  पोरं  काहीबाही  खात  नागडी  फिरत असतात. कोणाला कशाची  फिकीर  नसतेच  जणू. घोडे  पण कचराकुंडीत तोंड  खुपसून तो चिवडण्यात दंग झालेली असतात.  मेंढय़ा गेल्या की  परीसराची साफसफाई  झाडाच्या  छोट्या फांदीच्या मदतीने उरकली  जाते. लेंड्याचा हा ढीग दोनेक महीन्याच्या  वास्तव्यात  जमा होतो. पालावर कसाई  आले  की  त्याला  मेंढी  पसंत  पडे  पर्यंत  फिरवले  जाते. कळपातील  मेंढी  मागील  पाय धरून  उचलायची  आणि  तिच्या  वजनाचा  आदमास लावायचा  हा प्रकार  चालू  राहतो  व्यवहार  पक्का  झाला  की  कसाया कडून पैसे  घ्यायचे  हीच  पुढील  दिवसांची  ऊदरनिर्वाहाची  पुंजी.  मळकट  कपड्यात  फिरणारी  ही  लोकं  तुमच्या  आमच्या  पेक्षा  नक्कीच  जास्त  पैसे  बाळगुन असतात. कीती  कमी  गरजात राहणारी  ही  सगळी  मंडळी  बघितली  की  पांढरपेशा  समाजात  चाललेली  चढाओढ  बघून हसू  येतं. माणसाला  कीती  कमीत कमी  गरजात राहता येतं  हे  त्यांना  बघून  कळते.  डोक्यावर  छप्पर  नाही आज  इथे  राहुन  उद्या  दुसरीकडे  मुक्काम  असा  हा  पाल  वर्ष  वर्ष  फिरत  राहतो.  इतक्या  खडतर  जीवनात  ह्यांना  काय  आनंद  मिळत  असेल.  आपल्या  सारखे  जीवन  ही  माणसे  का  जगू शकत नाहीत. जीवन  ह्यांचे  खडतर  की  आपले?  या व इतर प्रश्नांची ऊत्तरे मी शोधत राहतो. 
माझ्या समोरच हा पाल एक दिवस  उठतो  आणि  पुढच्या  प्रवासाला चालू  पडतो मी मात्र  चार भिंतीच्या आत  बसून माझ्या मनात  चाललेल्या  कालव्याला  शांत करतो  बहुधा  पुढच्या  वर्षी  नक्कीच  मला ऊत्तर  सापडेल  असा  विचार करून  मी  परत चढाओढीत  सामील  होण्यासाठी सज्ज होतो....

6 comments:

  1. मस्त अजय! लगे रहो, शुभेच्छा पुढील लिखाणासाठी !

    ReplyDelete
  2. प्रिय बाळ्या...
    धन्यवाद. कुठेतरी आत असलेल्या व थोडया फार अनुभवातून हे लिखाण घडतयं. तु दिलेल्या शब्दाने उत्साह द्विगुणित झाला.

    ReplyDelete
  3. Replies
    1. धन्यवाद प्राजक्ता...

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
  4. सुंदर लिहीलंय अज्या, तुझ्या ह्या लेखासाठी मी तुला खास एक फोटो पाठवतो.

    ReplyDelete