Sunday, August 21, 2016

वाह रे सिंधू... वाह रे साक्षी

तसा मी लहानपणा पासून ऑलिम्पिक खेळ  बघतोय. साधारण  ऐशी  च्या दशकात माॅस्को ऑलिम्पिक वर आलेला एक सुंदर  चित्रपटही  मला  बघितलेला स्वच्छ आठवतोय. त्या  ऑलिम्पिक खेळाचा मस्काॅट असलेला अस्वल  ज्याचे नाव "मिशा" होते हे ही अजुन विसरलो  नाहीये. कारण त्या वेळी घराघरात टिव्ही  नव्हते  आजकालची चॅनेल संस्कृती तशी भारतीयापासून कोसो दूर होती.अगदीच  गेलाबाजार सधन घरात एखादा कृष्ण धवल बाॅक्स टिव्ही  असायचा आणि थोडक्यात  दाखवलेल्या क्षणचित्रावर समाधान मानावे  लागायचे. ऑलिम्पिक च्या खेळात पदकांच्या  बाबतीत भारत हा सदैव दुर्दैवी  ठरत आलेला देश हेच राहून राहून वाटायचे. खाशाबा जाधवांनी घेतलेल्या पदकाची माहीती  ही  फार ऊशीराने कळली. ऑलिम्पिक खेळ  सुरू व्हायच्या वेळचे संचलन ही पर्वणीच  असायची. विविध देशांतील  खेळाडू  ऐटीत  चालताना  बघून मस्त  वाटायचे  विशेषतः  भारतीय  संघ  दाखल  होत  असताना ऊर  अभिमानाने भरून यायचा. खेळ  चालू  असताना  वेगवेगळ्या  मासिकात  आलेले  फोटो  कापून  त्याचे  कोलाज करून  ठेवायचा  छंद  जडलेला  असायचा. त्यातून  सर्जी बुबका, जाॅयनर भगिनी, रशियन जिमनॅस्ट येलेना शुशकानोवा,  पीट सॅमप्रास, ऑल टाईम फेवरिट  गॅब्रीअला सबातिनी हे व इतर अनेक खेळाडू  ओळखीचे  होउन गेले ते अजून त्यांना विसरलो  नाहीये.
आजच्या ह्या लेखाचा उद्देश  खरतरं ह्याच्या  शीर्षकात दडलाय. खेळ आणि भारतीयांचे जणू  वाकडे असल्या सारखे वातावरण ह्या दोघींच्या  यशानंतर ढवळून निघालेय. बघावे तिथे साक्षी- सिंधू झळकतायेत. मूलतः खेळ  म्हणजे  वेळेचा  अपव्यय हा समज आपल्या  घराघरांत पसरलेला आहे. अशा कर्मठ समाज  मन असलेल्या  देशातल्या ह्या दोघींचे यश  खचितच उजवे ठरते. विविध  देशांतून आलेल्या  खेळाडू  समोर  कसब  पणाला लावून पदक  खेचून  आणण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते त्याला  तोड नाही. वर्तमान पत्रात आलेल्या  बातम्या  वरून  त्यांनी घेतलेल्या श्रमाची काही टक्के  माहीती होईलही कदाचित, पण एका साध्या 
खेळाडू पासून सुरू  झालेला हा प्रवास नक्कीच सोपा नसणार.... असंख्य मन दुखवणार्या घटनांचा सारीपाट  त्याच्या मागे असणार.. कौटुंबिक पातळीवर  मिळालेला हात तोच काय तर अश्वासक बाकी  सगळं रामभरोसे.. खेळाकरीता असलेल्या  संघटनांचे  राजकारण  हा तर कोणालाच  न चुकलेला  घटक.. कित्येक  खेळाडूची वाटचाल  ह्या  मुर्दाड  राजकारणा पायी  खुरटते.. खेळाडू  म्हटले की जिद्द, मेहनत ह्या  गुणांचा  गुणाकार  करावाच  लागतो अन्यथा  हार गळ्यात  पडलीच.. साक्षी  काय  सिंधू  काय  ह्या  दोघी  असल्या घुसमटून  टाकणार्‍या  व्यवस्थेतून गेल्या  असणारच.. किंबहुना  अशा  महाभयानक  व्यवस्थेचा  भाग असून त्यांनी  ज्या निकराने विजयश्री खेचून आणली ती खरचं कौतुकास्पद आहे. एकशे  पंचवीस कोटी  लोकसंख्या  असलेल्या ह्या महान  देशात दोन महीलांची ही पदक कमाई  खरेच एका विशेष घडणार्‍या घटनांची नांदी  आहे. छोट्या  देशातील  एकच धावपटू  नऊ सुवर्ण  पदकाची  लयलूट करतो म्हणजे किती  कमालीचा  आत्मविश्वास घेऊन तो इथे  आलेला  असतो ह्याची कल्पना करवत नाही. माझ्या  लहानपणा पासून पडलेला प्रश्न तरीही अनुत्तरित राहतो. कैक वर्षे पदकासाठी  झगडावे  लागणाऱ्या माझ्या भारत देशा पदकांचा हा दुष्काळ कधी संपेल का? टोकीओ ऑलिम्पिक खेळाची तयारी सुरू झाली म्हणे...
अशीच विजिगुषु मानसिकता माझ्या ही देशाला  लाभो..
साक्षी- सिंधू सह अनेक  नवीन तयार होणाऱ्या  खेळाडूना मनापासून शुभेच्छा...

4 comments:

  1. खूपच मार्मिक...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मित्रा.. लेखन आवडलं ह्याचे समाधान वाटले.

      Delete