फोटोग्राफी एक अत्यंत क्रांतीकारी संकल्पना आहे ह्याचा प्रत्यय मला गेल्या एक वर्षापासून येत आहे. मी ठीकठाक फोटो काढू शकतो ह्याची मला आधी पासूनच माहीत होते पण हा छंद इतक्या झटकन मला पावेल याची सूतराम कल्पना नव्हती. कॅमेरा हातात घेऊन फोटो काढणे म्हणजे काही वर्षांपूर्वी लग्न आणि सभासमारंभ इथपर्यंत सिमीत असलेले हे क्षेत्र आज आभाळ कवेत घ्यायला निघालेय. जो तो कॅमेरा हातात घेऊन फोटोग्राफर होऊ पहातोय. तसे होणे ही काही वावगे नाही पण आपल्या छंदाचा कोणाला त्रास होत नाहीये ना हे बघण्याची तसदी घेतलीत तर ठीक.
अनेक नवनिर्मित फोटोग्राफर जंगलात जाऊन तिथल्या प्राण्यांचे फोटो काढताना आपण तिथे घालत असलेल्या धुडगूसाकडे चक्क कानाडोळा करतात. आपल्या घरात कोणी येऊन दंगा केलेला आवडेल का ? हाच नियम जंगलात राहणाऱ्या जीवांना पण लागू होतो हे ह्या धुरीनांना कोण सांगणार....
जंगलात जाऊन तिथल्या वनसंपदेचा नायनाट करण्याचा, तिथे राहणाऱ्या जीवाचा आपल्याला हवे तसे फोटो काढण्याच्या हट्टापायी आपण केवढा मोठा गुन्हा करतोय हे कीत्येक सुशिक्षित, प्रशिक्षित फोटोग्राफर च्या गावीही नसते. जंगल फोटोग्राफी चे सर्व नियम धाब्यावर बसवून हे सगळे उद्योग सर्रास चालू असतात. एका वर्तमान पत्रात ह्या विषयावर एक लेख अलीकडेच माझ्या वाचनात आला म्हणून ह्या विषयावर मी माझे मत मांडले इतकेच. जाता जाता एक निर्वाणीचा ईशारा द्यावासा वाटतोय.... अजुनही वेळ गेलेली नाहीये, न जाणो सरकार ह्यावर पण एक कायदा करून वन्यजीव फोटोग्राफी ची वाटच बंद करून टाकेल...
मित्रानो, खबरदारी घ्या.. सावध ऐका पुढल्या हाका...
तुमच्या फोटोग्राफीच्या प्रवासाला शुभेच्छा !!!
Monday, May 9, 2016
जमलं तर बघा...
Sunday, May 1, 2016
विचार चक्र न चुकलेलं...
विचारांची भाऊगर्दी डोक्यात झालीये.. पार पार मंडई झालीये डोक्यात. काय करावे कळत नाही. विचारांच्या भुंग्याने डोक्याचा पोखरून पोखरून पार फडशा पडलाय. नको ते विचार असे होऊन गेलेय. झोपेशी काडीमोड कधीच झालाय. डोळे सुजुन भप्प झालेत. कुठल्यातरी अनामिक भीतीने थरकाप होतोय. शरीरभर एक विदयुल्लता निष्कारण सैरभैर पळतीये असे भास होतायत. कशाचा कशाला पत्ता नाही तरी पण हे सगळे खेळ मनात चालू आहेत. उगाच मनाची भ्रामक समजूत घालण्यात माझा वेळ चाललाय...पण मन माझे काही केल्या ऐकण्याच्या मूड मध्ये नाहीये. ऊडाणटप्पू पणा वाढीस लागलाय. ह्या सर्वांना वेसन कशी घालू ह्याचा ऊलघडा होत नाहिये. विचारांच्या भाऊगर्दीत आशेचा किरण पार मिट्ट काळोखात दडून गेलाय असे का कोणास ठाऊक सारखे वाटते.
मानसिक खच्ची तर नाही ना झालोय... कपोलकल्पित गोष्टी माझा पाठलाग करतायत जणू... कपाळावर जखम असलेल्या अश्वथामा सारखी स्थिती निर्माण झाली आहे...भळभळणारी ही जखम कधीच भरून येणार नाही का?
मनाच्या या खेळाचा मी एकटाच शिकार झालोय की अजूनही बरीच जण ह्या अवस्थेतून गेलीयेत/ जातायत. विषण्ण करणार्या अनेक घटनांचा ताळेबंद लागता लागत नाही. उगाच सैरभैर अवस्थेतील मनाचा हा सारीपाट कधी आणि कसा ठाकठीक होइल ह्याचा ऊलघडा कधीच होणार नाही का ?
ग्रीष्म ऋतूत पानांची पानगळ होते तसे काहीसे झाले आहे. आकाशात काळ्या कुट्ट ढगांची जशी भाऊगर्दी व्हावी अगदी तसचं मळभ दाटून आल्या ची भावना वाढीस लागली असे वाटतेय..... बस. बस.. बस...
काय ! इतकं सगळं वाचून क्षणभर भांबावून गेला असाल ना !! खरतरं वर लिहीलेल्या मानसिक अवस्थेतून आपण सर्व जण जातो / गेलेलो असतो फरक इतकाच की मी लिहून त्याला वाचा फोडायचा प्रयत्न केला बस...
Saturday, April 30, 2016
देणे घेणे असेही...
मनुष्य स्वभाव खूपच विचित्र आहे असं कधी वाटतं. बरं, ह्याला औषध आहे का, तर ते ही बर्याच लोकांनी शोधून झालयं सापडले नाहीये तो भाग अलाहिदा. माझेच उदाहरण बघा ना. माझा एक मित्र कीती दिवसापासून मला सांगतोय की "सर तुम्ही काहीतरी उच्च करा, तुमच्या मध्ये तो स्पार्क आहे"( मी बुचकळ्यात) च्यायला, मला इतकी वर्ष गेली तरी कुठेच तो सापडला नाही पण तमाम जनतेला कसा काय दिसतो.. (एक कोडेच) असो.
मुद्दा हा आहे की, स्वभाव कसा असतो बघा की कोणीतरी मला बघून त्याच्यात बदल घडवायचा प्रयत्न करतोय आणि मी आहे कि माझ्यातला 'मी' अजून शोधतोय..सगळ गणित अचाट आणि अतर्क्य आहे. भेटलेल्या माणसाकडून बर्याच वेळा आपल्याला खूप काही शिकायला मिळते. किंबहुना रोजच आपण ही देवघेव करत असतो आणि मार्गक्रमणा करत असतो. कधी कधी ही ऊत्तरं झटक्यात सापडतात पण कधी कधी काही वर्षे जावी लागतात. इतक्या सहजी हे कोडे उलघडणारे नक्कीच नाही. आपल्या सर्वांना असा अनुभव थोड्याफार फरकाने येत असणार म्हणा. पण मनावर न घेता चालढकल करत आपली मार्गक्रमणा चालू ठेवतो. इथे फक्त थोडे लक्ष घातले तरी ही बिन भांडवली देवघेव न जाणो काही देऊन ही जाईल...
Saturday, August 16, 2014
१५ ऑगस्ट १४: एक विचार
१५ ऑगस्ट म्हटले कि दरवेळी गाणी आणि चौका चौका मध्ये चाललेला गोंधळ हे असेच चित्र काही वर्षापूर्वी पर्यंत सगळीकडे दिसायचे. जवान बद्दल आपुलकी आणि प्रेम व्यक्त करायचा हा दिवस. ज्यांनी आपल्या छाती वर गोळ्या झेलून आज आम्हाला सुरक्षित ठेवले त्यांना वंदण्याचा हा दिवस... पण आपल्यातले किती जण त्या जवाना मध्ये जाऊन हा दिवस साजरा करतात कोणास ठाऊक. इतकी वर्ष मी हि ह्या गोंधळाचा भाग होतो पण आज मला आपल्या जवाना बद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली आणि नुसती संधी नाही मिळाली तर त्यांना प्रेमाने जेवू घालायचा पण योग आला.
wolfpack आणि bikarni ह्या दोन मोटार सायकल ग्रुप ने मिळून हा सुंदर कार्यक्रम घडवून आणला आणि आजच्या स्वातंत्र्य दिनाचे चीज झाले. दिवस उजाडला जणू एक उल्हसित सकाळ. पटापट आवरून बाहेर पडलो आणि तडक खडकीचे 'अपंग पुनर्वसन केंद्र' गाठले आमच्या आधी काही बाय कर मंडळी उपस्थित होतीच. हळू हळू व्हील चेअर वरील जवान मैदानात जमू लागले. ध्वजरोहणा नंतर त्या सर्व जवानांनी तिथे असलेल्या स्पर्धा मध्ये भाग घेऊन चांगला आदर्श निर्माण केला. माझ्या डोक्यात विचाराचे चक्र फिरायला सुरवात झाली होती. हाती पायी धड असलेल्या लोकांना पण जमणार नाही असे काही खेळ आणि करामती हि मंडळी करत होती आणि त्यांच्या बरोबर नियतीने केलेल्या क्रूर खेळाचा दुखाचा लवलेश हि त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. काय म्हणावे ह्या दुर्दम्य आशावादाला ? किती चटकन आपण एखादे काम जमणार नाही म्हणून सरळ हात झटकतो पण इथे तर ती मुभा नियती ने त्यांना दिलीच नाहीये. त्यांच्या ह्या परिस्थिती कडे बघून धड धाकट लोक जेव्हा एखादी गोष्ट करायला बिचकतात त्याची कीव येत होती. कितीतरी वेळा आपण सर्व जण काही न काही कारणाने आयुष्यात करायचा गोष्टी मागे ठेवत जातो. त्याला कारणे कुठलीही असोत पण खूप काही करायचे राहून गेले हि भावना कुठे तरी मनाच्या कोपऱ्यात असतेच असते. पण मग मनात आलेली कुठलीही गोष्ट करायला आपल्याला कोण आडवते ? शरीराचे सर्व अवयव धड धाकट असताना देखील आपण धजावत नाही... आणि आज इथे तर एका दुर्दम्य गोष्टीचे दर्शन घडत होते. कोणी खेळाडू म्हणून नाव गाजवत आहेत तर कोणाला कब्बडी चे सामने पहायचे आहेत. शरीर नुसती व्हील चेअर वर बसून आहेत पण मनात असलेला आशावाद काय वर्णावा...
आजचा स्वातंत्र्य दिवस खूप काही शिकवून जाणारा ठरला. इतकी वर्ष नुसतेच एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आलो होतो पण तिथे गेल्यावर जगण्याचा खरा अर्थ समजला. दुर्दम्य इच्छाशक्ती,आशावाद, दुखात असून हसणे काय असते याची प्रचीती आली.
Wednesday, May 28, 2014
मेहनतीचे फळ
गेले चारेक वर्ष झाली असतील मी माझ्या स्वप्नाचा पिच्छा पुरवतोय. निरनिराळ्या आघाड्या वर मी निरंतर मनात स्वप्न पाहत होतो.कधी कुठे शिबिराला जा. आवाजावर तयारी कर.असे एक ना अनेक प्रकार आणि प्रयोग चालूच आहेत. एक दोन ठिकाणी नकार हि पचवावा लागला. वेळ देऊन तयारी करून पण काहीच उपयोग झाला नाही आणि मी त्या कंपू मधून बाहेर फेकला गेलो. इतरही अनेक किस्से झाले पण त्यात मी अडकून पडायचे नाही असे ठरवले होते.वेगवेगळ्या लोकांच्या ओळखी हि तर ह्या माध्यमाची ताकद आहे हे मी पूर्वी पासून ओळखून होतो पण इथे आल्यावर खरी कसोटी लागली आणि हे क्षेत्र कसे आहे ह्याचे अंदाज यायला लागले.चुकातून शिकणे हा माणसाचा स्थायीभाव आहेच पण कधी कधी निराशेचे ढग हि तेवढेच दाट असतात आणि मग त्यातून तावून सुलाखून बाहेर पडणे हि जमायला हवे. मी खरेतर खूपच चौकस आणि अभ्यासू वृत्ती ने ह्या क्षेत्राकडे बघत आलोय माझ्या कामाच्या ठिकाणी मी ह्या क्षेत्रातल्या दिग्गज लोकांना जवळून बघितले आहेच पण त्यातील बरीचशी आता मला ओळखतात सुद्धा. खूप काही शिकायचे आहे ही वृत्ती अंगी बाळगली कि आपले मार्ग हि कसे छान खुले होतात आणि आपल्याला मार्गक्रमणा करणे पण सोप्पे जाते. एवढे सगळे सांगायचा मुद्दा हा कि, कालच माझ्या एका छोटी भूमिका असलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग रंगला. इतके दिवस धावपळ,वेळेचे गणित, घरातल्यांचा राग-लोभ ह्या सर्वावर काल मात झाली आणि मला त्याचे फळ मिळाले
गेले सव्वा महिना आम्ही आमच्या नाटकाची तयारी करत होतो. रोज काही ना काही नवीन शिकत आम्ही आमच्या नाटकाच्या तालमी चालू ठेवल्या होत्या.विषय तसा गंभीर होता पण आमच्या टीम ने एक सुंदर असा प्रयोग काल सादर केला आणि मी इतके दिवस बघत आलेलो स्वप्न हि पूर्ण झाले. "आरंभ" हे नाटकाचे शीर्षक हि किती चपखल. खरोखरच माझ्या आणि इतरही काहींच्या कारकिर्दी करिता आरंभ झाला म्हणायचा... पडद्यामागील भूमिका पण मला काल समजावून घेता आली आणि अंगावर पडलेला लाईट चा स्त्रोत हि अंगावर शहारे आणनारा ठरला. सुरवात खूपच चांगली झाली. एका उत्कृष्ठ टीम चे दर्शन काल झाले आणि नकळत वाटून गेले कि अरेच्चा.. आपण सारे इतके एकवटलो आहोत कि हाच काय ह्याच्या पुढचा प्रत्येक प्रयोग सुंदर होणार आहे.. खरच एका मस्त प्रवासाला काल सुरवात झाली आहे असे म्हणायला हरकत नाही. सर्व आप्त स्वकीयांच्या शुभेच्छा च्या बळावर हि नौका नक्कीच एक चांगला किनारा गाठेल ह्यात शंकाच नाही.
अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे. हि तर कुठे सुरवात आहे असे म्हणा हवे तर.. बघुयात भविष्यात हि नौका कुठे आणि कुठल्या किनाऱ्यावर लागते ते.
Tuesday, April 22, 2014
सफरनामा कोकणाचा..
नवीन बाईक घेतल्याला आताशा वर्ष पूर्ण होईल पण कुठेतरी लांब जावे हि सुप्त इच्छा पूर्ण व्हायला आठ महिने थांबावे लागले आणि तो दिवस आला. आम्ही ७ लोक आणि ५ बाईक असे शनिवारी १२ एप्रिल १४ रोजी पुण्याहून रवाना झालो. सकाळ चा सुमार आणि थंडी हि खूप वाजत होती पण पावरफुल बाईक ने रस्ता कापण्यात जी मजा आहे ती सांगून काय कळणार महाराजा... त्याला तर गाडी घेऊन हाय वे गाठावा लागतो असो.वेग म्हणावा तर ८० किमी प्रतितास असा ठेवून आम्ही कोकणच्या दिशेला कूच केले. ह्यावेळी पुनीत सिंग बांगा हाच आमचा लीडर होता फक्त रस्ता मीच त्याला सांगत होतो. वरंध घाट ओलांडून मंडळी कोकणात प्रवेश करती झाली आणि उन्हाची काहिली पण जाणवायला लागली. खेड पर्यंत मस्त गोवा हायवे होता आणि गाड्यांचे कान पिळणे एवढेच काम आम्ही करत होतो कारण रस्ता हा मलई होता.
वाऱ्याशी स्पर्धा करत आमचा प्रवास चालू होता आणि आम्ही खेड सोडून दाभोळ कडे रवाना झालो होतो. पण पुनीत च्या गाडीने दगाफटका केलाच बाईक पंक्चर झाल्याने आम्हाला थांबणे भाग पडले. उन्ह आता मी म्हणत होती पण गाडीचे काम करणे हि तेवढेच महत्वाचे होते आणि आम्ही ते करून लगेच पुढच्या प्रवासाला निघालो देखील... आता दाभोळ येथून आम्हाला बाईक फेरी बोट मध्ये टाकून पैलतीर गाठायचा होता. एक मस्त अनुभव घेत आम्ही धोपावे जेटी कडे निघालो
इथे एनरोन प्रकल्प वाकुल्या दाखवत थाटात उभा आहे जो सध्या रत्नागिरी ग्यास कंपनी कडे दिला आहे. कोकण चे क्यालिफोर्निया काही राज्यकर्ते करू शकले नाहीत ह्याचे दुख वाटून न घेत आम्ही मार्गक्रमण चालू ठेवले.इथून पुढचा टप्पा हा गुहागर मार्गे तवसाल गाठणे हा होता. दुपार टळून गेली होती.आणि आंम्ही बाईक स्वार आमच्या इप्सित पर्यंत पोचायच्या प्रयत्नात होतो. कोकणात फिरताना एक मात्र मजेशीर असते तिथले रस्ते हे तुमचे स्वागत करायला कायमच तयार असतात आणि त्यावरून प्रवास करताना एक आत्मिक आनंद हि अनुभवता येतो. इथून आम्ही गुहागर ह्या गावात प्रवेश करते झालो आणि आमच्या बुलेट गाड्या च्या दनदाणाटाने सगळा गाव बाहेर येवून बघत होता.आम्हाला ह्याची मजा हि वाटत होती. इथून तवसाल साधारण २१ किमी आहे रस्ता वळणे घेत घेत त्या गावातून एका छोट्याश्या जेट्टीवर पोचतो.
पुनःच्ह सर्व गाड्या आता टाकून पलीकडे पोचायचे होते आणि आमचा आता हा शेवटचा टप्पा असणार होता.सरकारने केलेला अणुकरार आणि त्या संदर्भात तिथे होत असलेले बदल आपण डोळ्या देखत बघू शकतो. जयगड जवळच सरकारने अणु वर वीज निर्मिती केंद्र सुरु करायचे घाटले आहे त्या मुळे इथला परिसर आता झपाट्याने कात टाकतोय. डोंगरच्या डोंगर फोडून रस्ते बनवले जातायत आणि इथली भौगोलिक रचनाच बदलत आहे. जिंदाल पॉवर कडे ह्याचे काम आहे आणि ते देखील झपाट्याने पुढे सरकतेय...
इथे पण नवीन रस्ता बनत असल्या कारणाने एका कच्च्या सडकेवरून आम्ही धुराळा उडवत समुद्र किनारी येवून पोहचलो आणि आम्ही मालगुंडच्या सीमा रेषेवर आहोत ह्याचे आकलन झाले. परत गाड्यांचे कान पिळत आम्ही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी सुखरूप पोहचलो होतो.